चिरंतन विकासात भारत पिछाडीवर!
By admin | Published: July 23, 2016 05:07 AM2016-07-23T05:07:58+5:302016-07-23T05:07:58+5:30
चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत भारत जगात पिछाडीवर असून, १४९ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ११0 वे आहे.
संयुक्त राष्ट्रे : चिरंतन विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत भारत जगात पिछाडीवर असून, १४९ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ११0 वे आहे. स्वीडन जगात सर्वोच्च स्थानी आहे.
चिरंतन विकास समाधान नेटवर्क (एसडीएसएन) आणि बर्टल्समॅन स्टिफगंग यांनी संयुक्तरीत्या ‘चिरंतन विकास निर्देशांक’ सादर केला आहे. या क्षेत्रात प्रत्येक देशाने केलेली प्रगती आणि उत्तरदायित्व निश्चित करणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे.
१४९ देशांची आकडेवारी तपासून हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. २0१६ मधील कामगिरीचा आढावा त्यात घेण्यात आला आहे. जागतिक पातळीवर १७ उद्दिष्टांना श्रेणी देऊन विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. या उद्दिष्टांत आर्थिक विकास, सामाजिक समावेशकता आणि पर्यावरणपूरकता आदींचा समावेश आहे. एसडीएसएनचे संचालक जेफ्री सॉक्स यांनी सांगितले की, या निर्देशांकामुळे कोणत्या देशांनी कोणती पाउले उचलली याची माहिती मिळते, तसेच या क्षेत्रातील प्रमुख आव्हाने काय आहेत. उद्दिष्टप्राप्तीसाठी व्यवहारिक मार्ग कोणते, याचीही माहिती मिळते. उद्दिष्टप्राप्तीच्या जवळ असलेल्या देशांत मोठ्या अर्थव्यवस्थांचा नव्हे, तर तुलनेने छोटे आणि विकसित देशांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
>स्वीडन पहिल्या स्थानी, डेन्मार्क दुसरा
स्वीडन पहिल्या स्थानावर असून, दुसऱ्या स्थानी डेन्मार्क आणि तिसऱ्या स्थानी नॉर्वे हे देश आहेत. जर्मनी सहाव्या स्थानी, ब्रिटन १0 व्या स्थानी आहे. अमेरिका २५ व्या स्थानावर, रशिया ४७ व्या, तर चीन ७६ व्या स्थानावर आहे. भारत ११0 व्या स्थानी, लेसोथो ११३ व्या स्थानी, पाकिस्तान ११५ व्या स्थानी, म्यानमार ११७ व्या स्थानी, बांगलादेश ११८ व्या स्थानी, तर अफगाणिस्तान १३९ व्या स्थानी आहे.
गरीब आणि विकसनशील देश या निर्देशांकात सर्वांत खालच्या पातळीवर आहेत. सर्वांत शेवटच्या स्थानावर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि लायबेरिया हे देश आहेत.