बांगलादेश मैत्रिला जागला, भारताला थेट स्वत:चं बंदर वापरण्याची दिली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 12:11 PM2022-04-29T12:11:24+5:302022-04-29T12:13:00+5:30
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी नुकतीच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संपर्क वाढवण्यावर भर देण्यावर चर्चा करण्यात आली. तसंच भारताच्या पूर्वेकडील राज्यांना संपर्क वाढवण्याचा दृष्टीनं चटगांव बंदराचा वापर करता येईल, असंही त्या म्हणाल्या.
“जर संपर्क वाढवला जात असेल तर आसाम आणि त्रिपुरा सारख्या भारतातील पूर्वेकडील राज्यांना चटगांव बंदराचा वापर करता येईल,” असं शेख हसीना यांनी कथितरित्या एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं. ढाका ट्रिब्यूननं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एस. जयशंकर यांनी गुरुवारी शेख हसीना यांची भेट घेतली.
चटगांव बंदर हे बांगलादेशमधील मुख्य बंदर आहे. जयशंकर आणि शेख हसीना यांच्या भेटीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे शेख हसीना यांना भारत दौऱ्याचं निमंत्रण दिलं. “दोन्ही देशांना फायद्यासाठी संपर्क वाढवण्याची गरज आहे. बागलादेशच्या दक्षिणपूर्व चटगांव बंदराचा उपयोग केल्यानं भारतच्या पूर्वोत्तर क्षेत्राला विशेष रुपानं फायदा होईल,” अशी बैठकीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांचे प्रेस सचिव एहसानुल करीम यांनी दिली. भारत आणि बांगलादेशदरम्यान सीमापार मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर ते बंद करण्यात आले होते, असा उल्लेखही शेख हसीना यांनी केला. यादरम्यान द्वीपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याचे करीम म्हणाले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांना त्यांच्या सोयीनुसार भारतात येण्याचं निमंत्रण दिलं. बैठकीदरम्यान द्विपक्षीय संबंधांशिवाय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली,” असं जयशंकर यांनी सांगितलं.