भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत

By admin | Published: July 17, 2017 05:19 PM2017-07-17T17:19:46+5:302017-07-17T17:19:46+5:30

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या परकीय गुंतवणुकीमुळे जागतिक महासत्ता बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचे चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.

India can become a big power, prediction of Chinese media | भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत

भारत बनू शकतो मोठी महासत्ता, चीनी प्रसारमाध्यमांचे भाकीत

Next
>ऑनलाइन लोकमत
पेईचिंगस दि. 17 -  सिक्कीम जवळील डोकलाम येथे सैन्यामध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे. तणावाच्या परिस्थितीत चीनी प्रसारमाध्यमे भारतावर कठोर भाषेत टीका करून आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. मात्र याचदरम्यान भारतात लागू झालेल्या जीएसटीची चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी प्रशंसा केली आहे. भारतात करण्यात आलेल्या करसुधारणेचे  ग्लोबल टाइम्समधील लेखातून कौतुक करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या परकीय गुंतवणुकीमुळे जागतिक महासत्ता बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना बळ मिळाल्याचे या लेखात नमूद करण्यात आले आहे. परदेशी उत्पादक भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.  भारतात होत असलेल्या सुधारणा आणि प्रयत्नांमुळे गुंतवणुकदारांना भारतातील आपले भवितव्य सुरक्षित वाटत आहे. 
आज भारताचा जसा आर्थिक विकास होत आहे, तसाच विकास दोन दशकांपूर्वी चीनचा होत होता. परदेशी गुंतवणुकीच्या मॉडेलचे अनुकरण करून चीनला यश मिळाले होते. आता भारतही त्याच वाटेवरून चालत आहे. त्यामुळे भारताला यश मिळणे जवळपास निश्चित आहे, असे या लेखात म्हटले आहे. भारताचा होत असलेला विकास आणि प्रगती पाहून चीनी सरकारने शांत राहिले पाहिजे. त्याबरोबरच भारताकडून होत असलेल्या स्पर्धेचा मुकाबला करण्यासाठी चीनने आपल्या विकासासाठी अधिक प्रभावी रणनीती आखली पाहिजे, असा सल्ला या लेखातून चीनी सरकारला देण्यात आला आहे.  
जीएसटीच्या माध्यमातून करण्यात आलेली करसुधारणा आणि त्यामधून मिळणारे आर्थिक फायदे याबाबत संशयाचे वातावरण दिसत आहे. मात्र परदेशी कंपन्यां भारतात आपल्या भवितव्याबाबत निश्चिंत आहेत.  जीएसटीमध्ये परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या स्मार्टफोन्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर दहा टक्के कर लावण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय फोन उत्पादक कंपन्या भारतात आपले उप्तादन सुरू करण्याचा विचार करत आहेत.  तैवानची फॉक्सकॉन कंपनी भारतात आपले कारखाने सुरू करण्यासाठी 32 खर्व रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. तर सॅमसंग भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी 40 खर्व रुपये गुंतवणार आहे, असे ग्लोबल टाइम्सने प्रसारमाध्यमांतील वृत्तांच्या आधारे म्हटले आहे.   

Web Title: India can become a big power, prediction of Chinese media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.