भारत पीओकेवर कारवाई करू शकतो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:38 AM2019-12-27T03:38:27+5:302019-12-27T03:39:02+5:30
इम्रान खान : लक्ष विचलित करण्यासाठी खटाटोप
इस्लामाबाद : भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) एखादी कारवाई करू शकतो, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. भारत देशांतर्गत मुद्द्यांवरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारची कारवाई करू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. झेलम जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना इम्रान खान बोलत होते. भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या लष्कराने दिल्यानंतर काही वेळातच इम्रान खान यांचे हे वक्तव्य आले आहे.
सध्या भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठी निदर्शने होत आहेत. त्यावर जगभरातून टीका होत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी भारतातील सरकार पीओकेमध्ये एखाद्या प्रकारची कारवाई करू शकते. मागील पाच महिन्यांपासून मी या कारवाईबद्दल जगाला सांगत आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, मी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांच्याशी भारताकडून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत बोललो आहे. त्यावर पाकिस्तान कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. गुरुवारी भारताच्या गोळीबारात ठार झालेल्या दोन सैनिकांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.
इम्रान खान म्हणाले की, नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) व राष्टÑीय नागरिकत्व नोंदणीविरुद्ध (एनआरसी) भारतात राहणारे २०० दशलक्ष मुस्लिम निदर्शने करीत आहेत. पाकिस्तान मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे काहीही करणार नाही, असे त्यांनी सांगितले.