आधी आरोप, आता संबंध सुधारण्याचा प्रयत्न; कॅनडाची एस जयशंकर यांच्यासोबत सीक्रेट मीटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 05:06 PM2023-10-11T17:06:29+5:302023-10-11T17:09:16+5:30
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.
India-Canada Relation: गेल्या महिन्यात कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी, या हत्येत भारताची भूमिका असल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध बिघडले आहेत. आता हे संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत अमेरिकेत गुप्त बैठक घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप दोन्ही देशांकडून दुजोरा मिळालेला नाही.
ब्रिटीश वृत्तपत्र फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार, एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली, यांच्यात ही बैठक झाली. मात्र, कॅनडा आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या बैठकीला दुजोरा दिलेला नाही. कॅनडाचे सरकार भारतासोबतचे राजकीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचेही या सांगण्यात आले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाही कॅनडाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले होते की, ते भारतासोबतचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत. आम्हाला कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी आहे. आम्ही भारताशी खाजगीत चर्चा करू, कारण आमचा विश्वास आहे की, बंद दाराआड झालेल्या राजकीय चर्चा यशस्वी होतात.
काय आहे प्रकरण ?
काही महिन्यांपूर्वी कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर, 19 सप्टेंबर रोजी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले की, कॅनडा दहशतवादी कारवायांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विचार करण्याची गरज आहे. आमचा निज्जरचा हत्येत सहभाग नाही, कॅनडाचे आरोप बिनबुडाचे आहेत.