चीननं काढली २० हजार भारतीय विद्यार्थ्यांविरोधात खुन्नस, भारतानं दिलं जशास तसं उत्तर!; कठोर निर्णय घेत केलं चीतपट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 01:32 PM2022-04-24T13:32:03+5:302022-04-24T13:32:30+5:30
Tit For Tat to China : भारताने चीनला आणखी एका आघाडीवर धडा शिकवला आहे. कोविडमुळे मायदेशी परतलेले २० हजार भारतीय विद्यार्थी पुन्हा चीनला अभ्यासासाठी जाण्याची वाट पाहत आहेत, मात्र चीन परवानगी देत नाहीये. आता भारतानेही चिनी नागरिकांचे टुरिस्ट व्हिसा रद्द केले आहेत.
नवी दिल्ली-
चिनी नागरिक आता टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊ शकणार नाहीत. जगभरातील एअरलाइन ऑपरेशन्सवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (IATA) दिलेल्या माहितीनुसार चीनी नागरिकांना जारी करण्यात आलेले भारतीय पर्यटक व्हिसा यापुढे वैध राहणार नाहीत. चिनी पर्यटकांना भारतात येण्यापासून रोखण्याच्या निर्णयाला भारताच्या बाजूने चीनला चोख प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जात आहे. कोविड-19 महामारीमुळे भारतात परतलेल्या २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये दाखल होण्यास टाळाटाळ केली जात आहे. उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही चिनी लोकांना व्यवसाय, रोजगार, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा जारी करत आहे.
चीनमध्ये कोविड-19 महामारीच्या नव्या लाटेशी झुंज देत आहे. तरीही, थायलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना येण्याची परवानगी दिली आहे, परंतु भारतातील हजारो विद्यार्थी अद्याप बीजिंगच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या चिनी समकक्ष वांग यी यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने गेल्या महिन्यात १५६ देशांसाठी इलेक्ट्रॉनिक टूरिस्ट व्हिसाची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. कोविडमुळे दोन वर्षांनंतर भारताने २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली आहेत.
चीनबरोबरच ब्रिटन-कॅनडानेही बंदी घातली
भारताने ब्रिटन आणि कॅनडातील नागरिकांना ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात येण्यापासून रोखले आहे. पण त्या देशांतील भारतीय मिशनने जारी केलेल्या नियमित कागदी व्हिसावर ते भारतात येऊ शकतात. ताज्या निर्णयानुसार, जपान आणि अमेरिका व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नागरिकांना दिलेला भारताचा पर्यटन व्हिसा यापुढे वैध राहणार नाही. भारतातील पर्यटक व्हिसाची वैधता १० वर्षांपर्यंत असते. जागतिक संस्था IATA वेळोवेळी अपडेट करत असते जेणेकरुन एअरलाइन्सना कळू शकेल की कोणत्या देशाच्या नागरिकांना कोणत्या देशात प्रवास करण्याची परवानगी आहे. १९ एप्रिल रोजी भारताविषयी नवे अपडेट जारी केले होते, ज्यामध्ये कोणत्या देशांचे नागरिक यापुढे ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात जाऊ शकणार नाहीत याची माहिती देण्यात आली.
भारताविषयीचा अहंकार चीन सोडेना
चीनसमोर भारत नतमस्तक होईल हा भ्रम चीन अजूनही सोडण्यास तयार नाही. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गडबड निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी फसलेला असतानाही चीन अजूनही भारताची भूमिका समजून घेऊ शकत नाही किंवा समजून घेऊ इच्छित नाही असंच दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेसह सर्व बलाढ्य पाश्चिमात्य देशांसमोर भारतानं रोखठोक भूमिका मांडली. किमान हे पाहून तरी चीननं काही तरी शिकायला हवं. तरीही चीन म्हणतं की तुमच्या बुद्धीला कुलूप लावलं गेलं असेल तर तुम्हाला स्वतःच्या ताकदीचा अभिमान वाटत राहील, समोरच्या व्यक्तीची ताकद कधीच दिसणार नाही. पण चीनच्या बाबतीतही तेच लागू होतं.