गिलगिट-बाल्टिस्तानवर भारताच्या 'मास्टरस्ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 08:18 AM2020-05-11T08:18:37+5:302020-05-11T08:22:52+5:30
भारतानं गिलगिट-बाल्टिस्तानवर केलेल्या कारवाईमुळेच सिक्कीममध्ये चीनकडून चकमक झाल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.
बीजिंग: चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) व भारतीय लष्कर यांच्या सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांमध्ये शनिवारी सिक्कीममध्ये व रविवारी दुपारी लडाखमध्ये तणातणी व शारीरिक हाणामारीच्या दोन घटना घडल्या. त्यात दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली. या हाणामारीत 4 भारतीय सैनिक आणि 7 चिनी सैनिक जखमी झाले असून, 150 सैनिक सामील होते. सुमारे 3 वर्षांनंतर दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू झाला. दरम्यान, भारतानं गिलगिट-बाल्टिस्तानवर केलेल्या कारवाईमुळेच सिक्कीममध्ये चीनकडून चकमक झाल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.
शक्य तितक्या लवकर चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर पूर्ण करायचं चीनचे राष्ट्रपती शी-जिनपिंग यांचे स्वप्न आहे. या कॉरिडॉरच्या बांधकामामुळे चीन आपला माल आमि सामान ग्वादर बंदराकडे इतर देशांना पाठवणार आहे. येथून चिनी वस्तू थेट आफ्रिका आणि जगाच्या इतर भागात पाठवणं सहजसोपं होणार आहे. हा कॉरिडॉर तयार झाल्यास चीनला आग्नेय आशियातील देशांच्या मार्गे माल पाठवावा लागणार नाही.
गिलगिट-बाल्टिस्तान चीनच्या राष्ट्रपतींचं स्वप्न पूर्ण करेल
चीन आणि पाकिस्तानदरम्यानचा हा आर्थिक कॉरिडोर पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातून जातो. चीनकडून या कॉरिडॉरच्या निर्मितीवर भारत सातत्याने आक्षेप घेत आहे. चीन सतत भारताच्या चिंता वाढवत आहे. दरम्यान, मंगळवारी भारताने गिलगिट-बाल्टिस्तान हा अविभाज्य भाग असल्याचे चीन आणि पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आता जम्मू-काश्मीर उपविभागाला 'जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुजफ्फराबाद' म्हटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद या दोन्ही देशांना पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले आहे. मंगळवारी आयएमडीने गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादसह वायव्य भारतासाठी अंदाज जाहीर केला.
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान घाबरून गेला आहे. पाकिस्तानने याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी)च्या ठरावांचे उल्लंघन म्हटले आहे. पाकिस्तानने गिलगिट आणि बाल्टिस्तानवरचे भारताचे दावे स्पष्टपणे नाकारले आहे. तसेच भारत बेजबाबदार पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. भारताने पूर्वीपासूनच स्पष्टपणे म्हटले आहे की, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने कब्जा केलेला हा प्रदेश हा त्यांचा अधिकृत नाही.
गिलगिट-बाल्टिस्तानला सिक्कीममध्ये चीनचं उत्तर
आंतरराष्ट्रीय घडामोडीतज्ज्ञ कमर आगा यांचे म्हणणे आहे की, ३ वर्षांनंतर चिनी सैन्याने सिक्कीममध्ये अतिशय सावधगिरीने हा संघर्ष केला आहे. आगा म्हणाले, "सिक्कीममध्ये चीनबरोबर झालेला हा संघर्ष भारताच्या गिलगिट-बाल्टिस्तानसंदर्भात उचललेल्या ताज्या पावलाचा प्रतिसाद आहे." चीनला कोणत्याही किमतीत आपला आर्थिक कॉरिडॉर पूर्ण करायचा आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाची साथ वेगानं पसरत असतानाही चिनी कॉरिडॉरचं अतिशय वेगवान काम सुरू आहे. '
कॉरिडॉरवर येणारे संकट पाहून चीनने सिक्कीममध्ये चिथावणी देणारी कारवाई केली. चीनने सिक्कीमला आपला भूभाग म्हणून वर्णन केले. दोन्ही देशांमधील या प्रदेशावरून दीर्घ काळापासून वाद सुरू आहे. चीनने भारताला हा निरोप पाठविण्याचा प्रयत्न केला की, पीओकेला आमचे सिक्कीम उत्तर आहे. या चकमकीचे आणखी एक कारण म्हणजे चीनचे अंतर्गत संकट. कोरोना संकटामुळे चीनची स्थिती वाईट आहे. अर्थव्यवस्था ढासळण्याच्या मार्गावर आहे. चीन वस्तूंचे उत्पादन करतो, पण जगात कोणतेही खरेदीदार नाहीत. यामुळे येणार्या काळात चीनची अर्थव्यवस्था निम्म्याहूनही कमी होईल. अशा परिस्थितीत चीन आपल्या देशात राष्ट्रवादाचा प्रचार करत आहे आणि अशा प्रकारे सीमेवरचा तणाव वाढवत चीन लोकांना हल्ल्याची भीती दाखवत आहे. जेणेकरून लोकांचं नोकरी, दारिद्र्य या विषयांवरून लक्ष विचलित होईल.
चीन सिक्कीममध्ये करतोय लष्करी जमवाजमव
यापूर्वी 2017मध्ये सिक्कीम प्रदेशात दोन्ही देशांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला होता. हा तणाव इतका वाढला होता की, भारताचे सर्वोच्च सैन्य अधिकारी बरेच दिवस त्या भागात तळ ठोकून होते. चिनी सैन्य या भागात रस्ता तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनने यापूर्वीच चुंबी व्हॅली क्षेत्रात रस्ता तयार केला आहे, जो सैन्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, त्या रस्त्याचा आणखी विस्तार करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. हा रस्ता सिलीगुडी कॉरिडॉर किंवा तथाकथित 'चिकन नेक' क्षेत्रापासून अवघ्या पाच किमी अंतरावर आहे. हा सिलीगुडी कॉरिडॉर भारताला पूर्वोत्तर राज्यांसह जोडतो. या कारणास्तव भारतीय सैनिक आणि चिनी सैन्य यांच्यात वारंवार संघर्ष होत असतो. भारतीय सैन्य दलाने पीएलएच्या जवानांना विवादास्पद भागात बांधकाम करण्यापासून रोखले होते. २०१७मध्ये झालेल्या संघर्षालाही हेच कारण होते. यानंतर चीनने या भागात एक मोठे सैन्य संकुल बांधले आहे. हे लष्करी संकुल डोकलाममध्ये बांधले गेले आहे.
वुहानमध्ये पंतप्रधान मोदी आणि चिनी अध्यक्षांची भेट
हे सैन्य संकुल भूतान आणि भारताच्या सीमेजवळ आहे. चीनने येथे हेलिकॉप्टर, टाक्या आणि क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. तत्पूर्वी डोकलाम वादानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात वुहानमध्ये अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीनंतर दोन्ही देशांनी परस्पर वाटाघाटीद्वारे हा वाद मिटवण्याचा निर्णय घेतला होता.