India-China Face Off - गलवान खोऱ्यात ३ तास घमासान, जाणून घ्या 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 08:13 AM2020-06-17T08:13:36+5:302020-06-17T08:14:04+5:30
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, गवलान खोऱ्यातील पॅट्रोलिंग पॉर्इंट १४ पाशी सैन्य माघारीची सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले
नवी दिल्ली : भारतीय सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात भारताच्या एका कर्नलसह तीन जवान शहीद झाले. याच हल्ल्यात भारताचे आणखी १७ जवान जखमी झाले होते. परंतु त्या परिसरात शून्याखाली असलेल्या तापमानामुळे ते वाचू न शकल्याने शहीदांची संख्या २० झाली. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे ४३ सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. गलवान खोऱ्यात रात्री तब्बल ३ तास हे घमासान युद्ध घडलं. हा तणाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि सैन्यप्रमुखांची दोनवेळा चर्चा केली.
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, गवलान खोऱ्यातील पॅट्रोलिंग पॉर्इंट १४ पाशी सैन्य माघारीची सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. त्यात दोन्ही बाजूचे जवान मृत वा जखमी झाले. मात्र, लष्कराने भारताचे किती जवान शहीद झाले, हे स्पष्ट केलेले नाही. दोन देशांच्या सीमेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीनने केल्यामुळे दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. मात्र भारतीय लष्कर वा
परराष्ट्र मंत्रालयाने आपले एकूण २० जवान शहीद झाल्याचे मान्य केले आहे. सीमेवर चीनच्या या कागाळीमुळे देशभर संतापाचे वातावरण आहे.
भारत आणि चीनमध्ये 6 जून रोजी मेजर जनरल रँक लेव्हलची चर्चा झाली होती. यामध्ये सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती झाली होती. 6 जूनच्या चर्चेनुसार चीनच्या सैनिकांना त्यांच्या सीमेत आणखी मागे जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र शांततेत चर्चा करण्याऐवजी चीनने वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर भारतीय सैनिक आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. घटनास्थळी भारतीय जवानांची संख्या चीनच्या सैनिकांच्या तुलनेने कमी होती. यावेळी चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर लाठ्याकाठ्या, दगड आणि टोकदार हत्यारांना भ्याड हल्ला चढवला. या हल्ल्यात 20 जवान जखमी झाले होते. त्यानंतर आज सकाळी भारतीय लष्कराने एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली होती. यामध्ये कर्नल संतोष बाबू, हवालदार पालानी आणि कुंदन झा यांचा समावेश होता.
दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ संभाषण सुरू असताना हा हल्ला करण्यात आला. यामध्ये गोळीबार नाही तर तुफान दगडफेक आणि काठीने मारहाण करण्यात आली. जवळपास तीन तास ही धुमश्चक्री सुरू होती. चीन सैनिकांनी केलेल्या हल्लाला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक जखमी आहेत तर काही जण बेपत्ता असल्याचंही सांगितलं जात आहे. या संपूर्ण घटनेवर मात्र चीननं मात्र अजून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलं नाही.
४५ वर्षांनी पुन्हा रक्तरंजित संघर्ष
भारत व चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी झालेली हाणामारी हा पूर्व सीमेवर दोन्ही देशांमध्ये ४५ वर्षांनी झालेला रक्तरंजित संघर्ष होता. याआधी अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर गस्त घालणाऱ्या आसाम रायफल्सच्या गस्ती तुकडीवर चिनी सैनिकांनी गनिमी काव्याने केलेल्या हल्ल्यात भारताचे चार जवान शहीद झाले होते.
53 वर्षांपूर्वी सन १९६७ मध्ये सिक्किम तिबेट सीमेवर नाथू ला खिंड व चो ला येथे दोन्ही सैन्यांमध्ये झालेली चक्क तुंबळ लढाई झाली होती.
88 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. पण त्याच्या बदल्यात ३४० चिनी सैनिकांचा खात्मा केला होता. दोन्ही देशांचे मिळून सुमारे एक हजार जवान जखमीही झाले होते. 1962च्या युद्धानंतरचा भारत व चीन यांच्यातील तो सर्वात भीषण संघर्ष होता.