India China Face Off: भारत-चीनमधील संघर्षावर आमचे जवळून लक्ष- अमेरिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:52 AM2020-06-18T02:52:10+5:302020-06-18T02:52:29+5:30
चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती.
वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतरच्या परिस्थितीवर अमेरिका खूप जवळून लक्ष ठेवून आहे आणि उभय देश मतभेद शांततेने मिटवतील, अशी आशा आहे, असे परराष्ट्र विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.
चिनी सैनिकांशी गलवान खोऱ्यात झालेल्या या हिंसक संघर्षात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान मरण पावले. साडेचार दशकांनंतर उभय देशांत झालेली ही पहिलीच सगळ्यात मोठी लष्करी चकमक होती. भारत आणि चीन यांच्यात आधीच सीमावाद चिघळलेला असताना त्यात या संघर्षाने भर घातली. ‘‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन यांच्या सैन्यातील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत,’’ असे परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्त्याने सोमवारी म्हटले. या संघर्षात आमचे २० सैनिक मरण पावल्याचे भारतीय लष्कराने जाहीर केले असून, आम्ही त्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत, असे हा प्रवक्ता म्हणाला. भारत आणि चीनने हा तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली असून, सध्याची परिस्थिती शांततेने दूर करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे त्याने म्हटले.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २ जून रोजी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर टेलिफोनवर चर्चा झाली होती, असे त्याने सांगितले.
दक्षिण आशिया हा महत्त्वाचा - अॅलिसा आयरेज
आघाडीच्या अमेरिकनतज्ज्ञांनी म्हटले की, चिनी लष्कराच्या योजनाबद्ध डावपेचांनी संपूर्ण विभागाला धोका निर्माण केलेला आहे. यातून अमेरिकेने एकच धडा घ्यायचा आहे तो म्हणजे भारत-चीन सीमा ही अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या रडार स्क्रीनवर हवी. कारण चीनची अरेरावी वाढत चालली आहे, असे कौन्सिल आॅन फॉरेन रिलेशन्सच्या अॅलिसा आयरेज यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, दक्षिण आशिया हा महत्त्वाचा असून, इंडो-पॅसिफिकचा तो मध्यभाग आहे.