India China FaceOff: गलवानमध्ये मारले गेले चीनचे ६० सैनिक, चकमकीबाबत मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 09:53 IST2020-09-14T09:44:40+5:302020-09-14T09:53:26+5:30
१५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनचे ३०-४० नव्हे तर तब्बल ६० सैनिक मारले गेले होते

India China FaceOff: गलवानमध्ये मारले गेले चीनचे ६० सैनिक, चकमकीबाबत मोठा गौप्यस्फोट
वॉशिंग्टन - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सध्या भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आलेले असल्याने कमालीचे स्फोटक बनलेले आहे. त्यातच पँगाँग सरोवराच्या परिसरातील उंचावरील ठिकाणांवर भारतील लष्करारे कब्जा केल्याने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याची कोंडी झाली आहे. त्यातच आता गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनवर ओढवलेल्या नामुष्कीबाबत मोठा गौप्यस्फोट झाला आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीमध्ये चीनचे ३०-४० नव्हे तर तब्बल ६० सैनिक मारले गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. या संघर्षात भारताच्याही २० जवानांना वीरमरण आले होते.
अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र असलेल्या न्यूजवीकने आपल्या नव्या अंकात याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आदेशानुसारच लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. चीनच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने दिलेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे चीनच्या नेतृत्वाला धक्का बसला आहे. गलवानमध्ये १५ जून रोजी झालेल्या संघर्षात भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४३ सैनिक मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या चकमकीत चीनचे ६० सैनिक मागले गेल्याचे न्यूजवीकने म्हटले आहे.
भारताकडून मिळालेल्या आक्रमक प्रत्युत्तरामुळे चीनची कपट चाल अयशस्वी झाली आहे. तसेच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आता भविष्यात देशामध्ये निर्माण होणाऱ्या आव्हानापासून मार्ग काढण्यासाठी पळवाट शोधत आहेत. सध्या चीनमधील कम्युनिस्ट पक्ष स्थित्यंतरामधून जात आहे. अशा परिस्थितीत जिनपिंग यांच्यासमोरील आव्हान वाढणार आहे. त्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याला आलेले अपयश पक्षांतर्गत घडामोडींमध्ये जिनपिंग यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे.
पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर पीएलएने घुसखोरी करून तळ ठोकला होता. मात्र भारतीय लष्कराने त्याला प्रत्युत्तर देताना जवळच्या पर्वतीय भागांवर कब्जा केला आहे.
भारताची चाल ठरली निर्णायक : फौजांनी केली महिनाभरापासून नियोजनबद्ध तयारी
लड्डाख सीमेवरील चीनच्या आक्रमक विस्तारवादाला शह देण्यासाठी भारतीय फौजांनी तब्बल महिनाभरापासून तयारी केली होती. अतिशय नियोजनबद्ध केलेल्या या कारवाईमध्ये पँगाँग तलावाजवळील सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या शिखरांवर भारतीय फौजांनी ताबा मिळवला. भारताच्या या मुसंडीने चीनही हबकला. हटवादी चीनसोबतची चर्चा निष्फळ ठरणार आहे, हे गृहीत धरूनच भारताने ही चाल केली होती. ती निर्णायक ठरली.
चीनच्या विस्तारवादाला शह देण्यासाठी भारताने २९-३० ऑगस्टला पँगाँग सरोवराच्या पूर्वेकडील महत्त्वाच्या डोंगरांवर ताबा मिळवला. या कारवाईमुळे रेझान्ग लापर्यंत चिनी फौजांवर बारकाईने लक्ष ठेवण्याबरोबर त्यांना भारतीय तोफांच्या माऱ्याखाली आणणे शक्य झाले. भारतीय फौजांची चाल चीनविरोधात निर्णायक ठरली. यामुळे चिनी फौजा खऱ्या अर्थाने माघारी फिरल्या. भारतीय सेनेने चीनच्या विरोधात या कारवाईला प्रतिबंधात्मक कारवाई संबोधले.
३० जूनला झालेल्या ध्वज बैठकीत सैन्य माघारी घेण्यासंदर्भात चीनने होकार दर्शवला होता. मात्र, त्यानंतर आश्वासन देऊनही फौजा मागे घेतल्या नाहीत. या कारवाईची माहिती मोजक्याच अधिकाऱ्यांना होती. कारवाईसाठी अनेक पर्याय ठेवण्यात आले होते. यात इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स, स्पेशल फ्रंटिअर फोर्स आणि भारतीय लष्कर, असे पर्याय ठेवण्यात आले होते. शेवटी स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले. या कारवाईमुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉप तसेच मॉल्डो येथील शिखरांवर ताबा मिळवता आला.