India China FaceOff: चीनच्या मुद्द्यावर 'या' देशाचा भारताला ठाम पाठिंबा; काहीही झालं तरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 02:06 AM2020-07-01T02:06:35+5:302020-07-01T06:57:14+5:30
पार्ली आणि राजनाथ सिंह यांच्यात सुरू असलेल्या चर्चांच्या पुढच्या भागासाठी राजनाथ सिंह यांना भारतात भेटण्याची इच्छाही त्यांनी पत्रात व्यक्त केली.
नवी दिल्ली : चीनसोबत नियंत्रण रेषेवर १५ जून रोजी झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान मारले गेल्यानंतर फ्रान्सनेभारताशी घट्ट एकजूट व्यक्त केली असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांंना फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांनी ‘ठाम आणि मित्रत्वाचा पाठिंबा’ दिला आहे.
पार्ली आणि राजनाथ सिंह यांच्यात सुरू असलेल्या चर्चांच्या पुढच्या भागासाठी राजनाथ सिंह यांना भारतात भेटण्याची इच्छाही त्यांनी पत्रात व्यक्त केली. पार्ली यांना राजनाथ सिंह यांनी भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. पार्ली यांनी संपूर्ण भारतीय सशस्त्र दलांना तसेच वीरमरण आलेल्या २० जवानांच्या कुटुंबियांना सहवेदना कळविल्या.
फ्लॉरेन्स पार्ली यांनी सोमवारी राजनाथ सिंह यांना लिहिलेल्या पत्रात २० भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
‘‘जवान, त्यांचे कुटुंबीय आणि देशासाठी हा मोठा आघात आहे. या कठीणप्रसंगी माझा ठाम आणि मित्रत्वाचा पाठिंबा फ्रान्सच्या सशस्त्र दलांसह देऊ इच्छिते,’’ असे पार्ली यांनी त्यात म्हटले. पार्ली यांनी भारत हा विभागात फ्रान्सचा व्यूहरचनात्मक भागीदार असल्याची आठवण करून दिली.