India China Faceoff: भारताची ताकद वाढणार; शक्तीशाली मित्राकडून मोठं सुरक्षाकवच घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 04:07 PM2020-06-28T16:07:45+5:302020-06-28T16:23:02+5:30
चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत घुसखोरी करणे महागात पडू शकेल, अशी तयारी भारताने सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केली आहे.
लडाखच्या गलवान खोऱ्यात LACवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील तयार झाले आहेत. मात्र दोन्ही देशांमधील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, असं चीनकडून सांगण्यात येत आहे. परंतु दूसरीकडे चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. भारतीय लष्करानेदेखील चीनच्या या आगळीकीला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे.
चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत घुसखोरी करणे महागात पडू शकेल, अशी तयारी भारताने सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केली आहे. चीनच्या दगाफटक्याचा अंदाज असल्याने हवाई हल्ला परतवणारे क्षेपणास्त्र ईशान्य लद्दाख सीमेवर सज्ज आहे. लष्करी गुप्तहेर यंत्रणेनेही चिनी हेलिकॉप्टर घुसखोरी करण्याची शक्यता वर्तवली असून, त्यालाच कठोर संदेश देण्यासाठी भारताने क्षेपणास्त्र सज्ज ठेवले आहे. त्यातच आता भारताचा मित्र असलेल्या इस्राएलकडून एक मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. भारत इस्राएलकडून लवकरात लवकर एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीमेवरुन भारत आणि चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तणाव सुरु आहे. याच दरम्यान भारत इस्राएलकडून 'बराक-८ एलआरएस' डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. बराक-८ एलआरएसद्वारे लांब पल्ल्यावरील अंतरावर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. 'एलआरएसएएम'चा अर्थ लाँग रेंज सरफेस टू एअर मिसाइल असा आहे. तसेच भारताने २०१८मध्ये इस्राएलसोबत जवळपास ५६८७ कोटी रुपयांच्या 'बराक-८' मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा करार केला आहे. त्यानूसार आता भारत इस्राएलकडून बराक-८ एलआरएस' खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
चीनने आता कुरापती केल्यास योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सज्ज आहेत. सीमेवर चीनने आपल्या सैन्यात वाढ केल्यानंतर भारताने गलवान घाडी, दौलत बेग ओल्डी, चुशुल आणि देपसांगमध्ये अतिरिक्त जवान तैनात केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तर भारतावर दबाव वाढविण्यासाठी चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा आपले सैन्य तैनात करण्याची शक्यता भारतीय लष्कराला आहे. भारत एलएसीवरील फायरिंगच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ड्रॅगनचा घुसखोरीचा पवित्रा उघड
पूर्व लडाख सीमेवरील पॅनगाँग त्सो सरोवर भागात चीनने नव्या हेलिपॅडचे बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे माघारीऐवजी चीनचा घुसखोरीचा पवित्रा उघड झाला आहे. सीमेवर ६ जूनपूर्वीची ‘जैसै थे’ स्थितीसाठी चीन तयार नसल्याचे दिसते. पॅनगाँग सरोवराच्या उत्तरेकडेत चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने तिथे निवाºयासाठी खोल्या, पिलबॉक्सेस व खंदक अशी बांधकामे केली होतीच. आता ‘फिंगर ४’ जवळ चीनचे सैन्य नवे हेलिपॅड उभारत आहे.
चीनचे नाटक : पॅनगाँग सरोवर तीन बाजूंनी पर्वतराजींनी वेढलेले आहे. त्यांच्या सुळक्यांना ‘फिंगर १,२,३...’ असे संबोधले जाते. चीनच्या सैन्याचा कायमस्वरूपी तळ ‘फिंगर ८’पाशी असून, आणखी आठ किमी पश्चिमेस ‘फिंगर ४’पर्यंत हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
दक्षिणेकडील काठावरही चिनी सैन्याची उपस्थिती वाढली आहे. यातून आपण आधीपासूनच तिथे आहोत, असे भासवण्याचे नाटक चीन करीत आहे.