'हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन...' जयशंकर यांच्या वक्तव्याने चीनला झोंबली मिरची
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:43 PM2024-05-14T14:43:44+5:302024-05-14T14:44:41+5:30
India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सीमावादाबाबत केलेल्या एका वक्तव्याने चीनी संरक्षण तज्ञाने संताप व्यक्त केला.
India-China News : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या एका वक्तव्याने चीनला चांगलीच मिरची झोंबली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत चीनसोबतच्या सीमावादावर बोलताना जयशंकर म्हणाले होते की, 'चीनशी चांगले द्विपक्षीय संबंध ठेवण्यासाठी सीमेवर शांतता राहणे गरजेचे आहे. ज्या मुद्द्यावरुन चीनसोबतचा वाद अद्याप संपलेला नाही, ते मुख्यत्वे गस्तीचे अधिकाराशी संबंधित आहेत.' यावर आता चिनी संरक्षण तज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे वक्तव्य चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
'चीनला हे कळायला हवं...'
मुलाखतीदरम्यान जयशंकर म्हणाले होते की, 'आज आपले चीनसोबतचे संबंध सामान्य नाहीत. याचे कारण म्हणजे सीमेवरील शांतता भंग पावली आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती आपल्या हिताची नाही, हे चीनला कळायला हवं.' या मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूजवीक मासिकाला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ दिला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांनी सीमा विवादावरील तोडगा केवळ भारत-चीन संबंधांसाठीच नाही, तर संपूर्ण प्रदेश आणि जगासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते.
चिनी तज्ज्ञांची भारताविरोधात भूमिका
परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यावर शांघाय अकादमी ऑफ सोशल सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे रिसर्च फेलो हू झिओंग यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना म्हटले की, जयशंकर यांच्या टिप्पण्यांबाबत चीनने अधिक सावध राहायला हवं. जयशंकर यांनी 'राइट टू पेट्रोल'वर केलेली टिप्पणी म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. आता चीनने केवळ भारताची सामान्य चर्चाच करू नये, तर लष्करी संघर्षासाठीही तयार राहावे. जयशंकर यांनी चीनला चिथावणी देऊन सीमा आणि गस्तीच्या अधिकारांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.