भारत-चीनने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी तयार करावे अनुकूल वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:51 AM2021-03-08T02:51:53+5:302021-03-08T02:52:05+5:30
चिनी विदेशमंत्री : द्विपक्षीय सहयोगाचा विस्तार
बीजिंग : भारत व चीनने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी एकमेकाला नुकसान पोहोचविणे व एकमेकांवर संशय घेणे सोडले पाहिजे व द्विपक्षीय सहयोग वाढवून अनुकूल वातावरण तयार केले पाहिजे, असे चीनचे विदेशमंत्री वांग यी यांनी रविवारी म्हटले आहे. वांग यांनी म्हटले आहे की, भारत आणि चीनच्या संबंधांसाठी सीमावाद पूर्णपणे जबाबदार नाही. दोन्ही देश मित्र व भागीदार आहे. परंतु त्यांनी एकमेकांवर संशय घेणे सोडले पाहिजे.
मागील वर्षी मे महिन्यात लडाखमध्ये सीमावाद निर्माण झाल्यानंतर भारत-चीन संबंधांच्या विद्यमान स्थितीवर आपल्या वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी आपल्या वादविवादांचा निपटारा करावा व द्विपक्षीय सहयोगाचा विस्तार करावा. सीमावाद इतिहासाची देण आहे. तो दोन्ही देशांच्या संबंधांसाठी पूर्णपणे जबाबदार नाही. वांग यांनी चीन संसद नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक सत्राच्या वेळी पत्रपरिषदेत सांगितले की, दोन्ही देशांनी वादांचे योग्यप्रकारे निपटारा करावा व सहयोग वाढवावा. त्यामुळे मुद्दे सोडविण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. तथापि, त्यांनी दोन्ही देशांत सैन्य स्तरावर दहाव्या चर्चेनंतर पूर्व लडाखमध्ये पेंगाँग सरोवराच्या उत्तर व दक्षिण किनाऱ्यांवर सैनिकांच्या वापसीबाबत काहीही कसलीही टिप्पणी नाही. भारताचे विदेशमंत्री जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून ७५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर सीमा मुद्द्यावर वांग यांनी वरीलप्रमाणे वक्तव्य केले आहे. दरम्यान, शुक्रवारी भारतीय राजदूत विक्रम मिस्त्री यांनी चीनचे उपविदेशमंत्री लुओ झाओहुई यांच्याशी चर्चा केली होती व पूर्व लडाखच्या सर्व भागांतून सैनिक वापसीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.
वांग यांनी म्हटले आहे की, भारत व चीन या दोन्ही विकसनशील देशांनी एकमेकांच्या हितांचे रक्षण करावे व जगात बहुध्रुवीय व्यवस्था मजबूत करावी, अशी जगाची अपेक्षा आहे. चीनच्या विदेश मंत्र्यांनी म्हटले आहे की, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले दृष्टिकोन समान आहेत. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांचे मित्र, भागीदार आहेत. ते एकमेकांसाठी धोका नाहीत किंवा प्रतिद्वंद्वी नाहीत. सफल होण्यासाठी नुकसान पोहोचविण्याऐवजी एकमेकांची मदत केली पाहिजे. सीमावर्ती भागांत मागील काही वर्षांत जे झाले ते चुकीचे झाले, हे स्पष्ट आहे. सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्यास वचनबद्ध आहोत.