भारताला अतिरेक्यांकडील रासायनिक अस्त्रांची चिंता
By admin | Published: October 21, 2016 03:16 AM2016-10-21T03:16:53+5:302016-10-21T03:16:53+5:30
दहशतवादी गट रासायनिक अस्त्रे मिळवत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून भारताने या अस्रांचा भविष्यात वापर होणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने
संयुक्त राष्ट्रे : दहशतवादी गट रासायनिक अस्त्रे मिळवत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून भारताने या अस्रांचा भविष्यात वापर होणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने परिणामकारक कृती करावी, असे आवाहन केले.
कोणत्याही परि स्थितीत, कोणाहीकडून व कुठेही रासायनिक अस्त्रांचा वापर न्याय ठरवला जाऊ शकत नाही या आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही व त्यामुळेच असले घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे भारताचे राजदूत डी. बी. वेंकटेश वर्मा यांनी म्हटले. ते बुधवारी मोठ्या प्रमाणावरील विध्वंस विषयावरील चर्चेत बोलत होते. जीनिव्हातील नि:शस्त्रीकरण परिषदेवर वर्मा हे स्थायी प्रतिनिधी आहेत.
दहशतवाद्यांनी रासायनिक अस्त्रे व ते वापरण्याची व्यवस्था प्राप्त केल्याच्या वृत्तांमुळे तसेच दहशतवाद्यांकडून सिरिया आणि इराकमध्ये रासायनिक अस्त्रे व विषारी रसायनांचा सतत वापर होत असल्याबद्दल भारताला खूपच काळजी वाटत आहे, असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या सत्रात ते बोलत होते. वर्मा म्हणाले, रासायनिक अस्त्रांचा भविष्यात वापर होणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय तातडीने कृती करील असा आम्हाला विश्वास आहे. (वृत्तसंस्था)