अमेरिका असो या युरोप, कुणाचीच पर्वा नाही; रशियाकडून तेल खरेदीचे भारतानं मोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:19 PM2023-03-05T15:19:00+5:302023-03-05T15:19:27+5:30

रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात फेब्रुवारीमध्ये विक्रमी १.६ दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाली आहे.

india creates new record in crude oil import from russia | अमेरिका असो या युरोप, कुणाचीच पर्वा नाही; रशियाकडून तेल खरेदीचे भारतानं मोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड!

अमेरिका असो या युरोप, कुणाचीच पर्वा नाही; रशियाकडून तेल खरेदीचे भारतानं मोडले आजवरचे सर्व रेकॉर्ड!

googlenewsNext

नवी दिल्ली-

रशियाकडूनभारताची कच्च्या तेलाची आयात फेब्रुवारीमध्ये विक्रमी १.६ दशलक्ष बॅरल प्रतिदिन झाली आहे. ही आकडेवारी भारताच्या पारंपारिक पुरवठादार इराक आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित तेलाच्या आयातीपेक्षा जास्त आहे. व्हर्टेक्सा या तेलाच्या आयात-निर्यातीवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार, भारताने आयात केलेल्या तेलाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त तेल रशियानेच पुरवले आहे. रशिया हा सलग पाचव्या महिन्यात भारताला कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश राहिला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धापर्यंत भारताच्या तेल आयातीमध्ये रशियाचा वाटा एक टक्क्यांहून कमी होता. परंतु गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये ते ३५ टक्क्यांनी वाढून १६.२० लाख बॅरल प्रतिदिन झाला आहे.

अमेरिका आणि सौदी अरेबियाकडून कमी तेल खरेदी
रशियाकडून भारताची आयात वाढल्याने सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून होणाऱ्या तेल आयातीवर परिणाम झाला आहे. सौदी अरेबियातून आयात होणाऱ्या तेलात मासिक आधारावर १६ टक्क्यांनी घट झाली आहे, तर अमेरिकेतून तेलाची आयात ३८ टक्क्यांनी कमी झाली आहे. व्हर्टेक्साच्या मते, भारत आता रशियाकडून जेवढे तेल आयात करतो ते इराक आणि सौदी अरेबियापासून अनेक दशकांपासून पुरवठादार असलेल्या एकूण आयातीपेक्षा जास्त आहे.

इराककडून दररोज ९,३९,९२१ बॅरलचा पुरवठा
इराकने फेब्रुवारी महिन्यात प्रतिदिन ९,३९,९२१ बॅरल तेलाचा पुरवठा केला. तर सौदी अरेबियाने दररोज ६,४७,८१३ बॅरलचा पुरवठा केला. इराक आणि सौदी अरेबियाकडून गेल्या १६ महिन्यांतील हा सर्वात कमी पुरवठा आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, संयुक्त अरब अमिरातीने भारताला दररोज ४,०४,५७० बॅरलचा पुरवठा करून अमेरिकेला मागे टाकले. अमेरिकेने दररोज २,४८,४३० बॅरल तेलाचा पुरवठा केला, जो जानेवारीच्या ३,९९,९१४ बॅरल प्रतिदिन पुरवठ्यापेक्षा कमी आहे.

रशियन तेलाचा फायदा भारतीय कंपन्यांना
व्हर्टेक्सा येथील आशिया-पॅसिफिक विश्लेषणाच्या प्रमुख सेरेना हुआंग म्हणाल्या, “रशियाकडून येणाऱ्या स्वस्त कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणामुळे भारतीय रिफायनर्सना जास्त नफा मिळत आहे. हा ट्रेंड आगामी काळातही कायम राहण्याची अपेक्षा आहे. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पाश्चात्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांना तोंड देण्यासाठी रशिया सध्या भारताला विक्रमी प्रमाणात कच्चे तेल विकत आहे"

Web Title: india creates new record in crude oil import from russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.