मी अमेरिकन नागरिक असलो तरी अंत:करणात भारतच : सुंदर पिचाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 01:40 PM2021-07-13T13:40:47+5:302021-07-13T13:43:46+5:30
Google च्या CEO नं ओपन इंटरनेटबद्दल केलं भाष्य. आपण आज जे काही आहोत त्यात भारताचा मोठा वाटा, सुंदर पिचाई यांचं वक्तव्य.
Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना आपण आज जे काही आहोत त्यात भारताचा मोठा वाटा असल्याचं वक्तव्य केलं. यादरम्यान त्यांनी ओपन इंटरनेटच्या धोक्यांसह अनेक विषयांवर दिलखुलासपणे आपलं मत व्यक्त केलं.
"मी एक अमेरिकन नागरिक आहे, परंतु आजही माझ्या अंत:करणात भारत आहे. यामुळेच आज मी जे काही आहे त्यात भारताचा मोठा वाटा आहे," असं सुंदर पिचाई म्हणाले. कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅली येथे Google मुख्यालयात त्यांनी BBC ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवरही मत व्यक्त केलं. "मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला सर्वात ताकदवान तंत्रज्ञानाच्या रूपात पाहतो. याचा विकास मानवच करेल आणि तो त्यावर काम करेल. जर तुम्ही आग किंवा वीज अथवा इंटरनेटबाबत विचार केला तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही तशीच गोष्ट आहे," असं पिचाई म्हणाले.
मुलाखतीदरम्यान त्यांना सर्विलान्सवर आधारिक इंटरनेटचं चिनी मॉडेल वाढत आहे का? असा सवाल करण्यात आला. "फ्री आणि ओपन इंटरनेवर आता हल्ला केला जात आहे," असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी थेट चिनचा उल्लेख करणं टाळलं. आपले प्रमुख प्रोडक्ट्स आणि सेवा या चीनमध्ये जात नसल्याचं म्हटलं.