श्रीलंकेतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारताचा पुढाकार, तातडीनं पोहोचवला १०० टन नॅनो लिक्विड युरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 06:13 PM2021-11-04T18:13:21+5:302021-11-04T18:14:24+5:30
नॅनो लिक्वीड युरियाची मागणी देशासोबतच परदेशातही वाढली आहे. भारतानं गुरुवारी हवाई दलाच्या दोन विमानांच्या सहाय्यानं श्रीलंकेला १०० टन नॅनो लिक्विड युरियाचा पुरवठा केला आहे.
नवी दिल्ली
नॅनो लिक्वीड युरियाची मागणी देशासोबतच परदेशातही वाढली आहे. भारतानं गुरुवारी हवाई दलाच्या दोन विमानांच्या सहाय्यानं श्रीलंकेला १०० टन नॅनो लिक्विड युरियाचा पुरवठा केला आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. श्रीलंकेतील तुटवडा लक्षात घेऊन भारतानं तातडीनं लिक्वीड युरियाचा पुरवठा केला आहे. भारतानं यंदा इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडनं (IFFCO) शेतकऱ्यांसाठी नॅनो लिक्विड युरिया निर्मितीस सुरुवात केली आहे.
"प्रकाशाचा सण दीपावलीच्या दिवशी भारतीय हवाई दल पुन्हा एकदा श्रीलंकेसाठी आशेचा किरण घेऊन आलं आहे. श्रीलंका सरकारद्वारे भारताकडून तातडीनं युरियाची मागणी केली गेली होती आणि भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांच्या माध्यमातून १०० टन नॅनो युरिया घेऊन कोलंबोला पोहोचले", असं ट्विट भारतीय उच्चायुक्तांनी केलं आहे.
On the day of #Deepawali,the Festival of Lights,#indianairforce once again brought ray of hope to #SriLanka.Responding to GoSL’s call for urgent support in airlifting nanofertilizers from #India,2 @IAF_MCC planes arrived in #Colombo carrying 100 tons of the product today. pic.twitter.com/tEZ3XP2OTZ
— India in Sri Lanka (@IndiainSL) November 4, 2021
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी रासायनिक खतांच्या आयातीवर निर्बंध लादले होते. आता बऱ्याच महिन्यानंतर सरकारनं नॅनो लिक्विड युरियाची आयात केली आहे. सरकारकडून बंदी घालण्यात आल्यानंतर श्रीलंकेत युरियाचा तुटवडा निर्माण झाला होता. भारतानं आता श्रीलंकेला नॅनो लिक्विड युरियाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.