भारताला मेहरबानी नको
By admin | Published: November 14, 2015 04:01 AM2015-11-14T04:01:31+5:302015-11-14T04:01:31+5:30
भारताने आपले सामर्थ्य दाखवून दिल्याने भारताला आता जगाची मेहरबानी नको आहे; तर बरोबरीचा दर्जा हवा आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभ्या जगाला दहशतवाद आणि ग्लोबल
लंडन : भारताने आपले सामर्थ्य दाखवून दिल्याने भारताला आता जगाची मेहरबानी नको आहे; तर बरोबरीचा दर्जा हवा आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभ्या जगाला दहशतवाद आणि ग्लोबल वार्मिंगच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी भारताची ठोस भूमिका असेल, अशी ग्वाही लंडनमधील वेम्ब्ली स्टेडियमध्ये ६० हजारांहून अधिक भारतीय समुदायाशी बोलतांना दिली.
नमस्ते म्हणत भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊन त्यांनी भाषणाची सुरुवात केली. दिवाळी चांगली साजरी केली का? अशी विचारणा करीत त्यांनी उपस्थित भारतीयांच्या हृदयाला हात घातला. तसेच मोठ्या जल्लोषाने स्वागत केल्याबद्दल ब्रिटन सरकार, ब्रिटनवासी आणि भारतीय समुदायाचे आभार मानले.
अठरा महिन्याच्या अनुभवातून सांगतो की, भारताला आता गरीब राहण्याची गरज नाही. आज जो कोणी बोलतो, तो बरोबरीने बोलतो. जगातील प्रत्येक देश भारताशी संबंध जोडण्यास आतुर आहे, असे ते म्हणाले.
कबीर, रहिम यांचा भारत आहे. विविधता ही भारताची शक्ती आहे. सुफी परंपरा प्रभावी झाली असती तर आज बंदुका हाती घेण्याचा कोणीही विचार केला नसता. दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग या दोन्ही समस्यांवर आज महात्मा गांधी यांचे विचार, अहिंसा हेच एक उत्तर आहे.
स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास जेव्हा नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचे आगमन झाले तेव्हा प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रथम कॅमेरून यांनी भूमिका विशद केली. इंग्रजीतून भाषणाची सुरुवात करणाऱ्या मोदींनी हिंदीतून भाषण सुरू करताच उपस्थितांतून उत्साह वाढत गेला. मोदी मोदी
भारताने ज्या गतीने आणि दिेशेने विकास यात्रा सुरु केली आहे, त्याची फळे भारत आणि जगाला नजीकच्या काळात निश्चित पहावयास मिळतील, असा विश्वास देत पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छ भारत, कौशल्य विकास, डिजिटल इंडिया, बेटी बढावो बेटी पढाओ, जनधन आणि मेक इन इंडियासह अन्य महत्त्वाकांक्षी योजना व उपक्रमांचा उल्लेख केला.
१२५ कोटींच्या भारतात ८० कोटी लोकांचे वय ३५ वर्षापेक्षा कमी आहे. तरुणाईचा हा देश आता कोणत्याही बाबतीत मागे राहू शकत नाही. विकासाच्या वाटेवरून पुढे जाईल, असा ठाम विश्वास देत त्यांनी आर्थिक सुधारणांच्या दिशेने घेतलेल्या निर्णयांचाही आवर्जून उल्लेख केला.
फास्ट डेव्हलप इंडिया अशी ‘एफडीआय’ची नवीन व्याख्या सांगत रेल्वे थेट परकीय गुंतवणुकीसाठी खुली केली आहे. लंडनच्या शेअर बाजारात भारतीय रेल्वेने रूपी बॉन्ड आणल्याची खुश खबरही त्यांनी यावेळी दिली. संरक्षण क्षेत्र स्वावलंबी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. ओसीआय, पीआयओ विलीन करण्यात आल्याची आणि आधीपेक्षा अधिक सुलभ करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली.
भारतातील १८ हजार गावांत वीज पोहोचविण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखविला. आॅलिम्पिक उद्घाटन सोहळ्याला साजेसा हा स्वागत सोहळा झाला. ब्रिटनच्या धरतीवर एखाद्या विदेशी नेत्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा सर्वात मोठा कार्यक्रम होता.
भारत - इंग्लंड अणुकरार
पंतप्रधान मोदी यांनी या तीन दिवसांच्या भेटीत इंग्लंडबरोबरच्या नागरी अणुकरारावर स्वाक्षरी केली. हा अणुकरार म्हणजे दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या परस्पर संबंधांचे व हवामान बदलाशी लढण्याच्या आमच्या संकल्पाचे प्रतीक आहे, असे मत डेव्हिड कॅमेरून यांनी व्यक्त केले. या निवेदनामध्ये कॅमेरून यांनी मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया या योजनांचा उल्लेख करत, त्यामध्ये आमचा सहभाग नक्की असेल, असे आश्वासन दिले. भारत-इंग्लंड सांस्कृतिक वर्ष : २०१७ हे वर्ष भारत आणि इंग्लंडमध्ये ‘सांस्कृतिक वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय या भेटीत घेतला असून, जगप्रसिद्ध मादाम तुसॉ या मेणाच्या पुतळ्यांच्या गॅलरीची शाखा नवी दिल्लीमध्ये उघडण्याचाही निर्णय घेण्यात आला.
घोषणा आणि निदर्शने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लंडनमध्ये भारतीय वंशाच्या समुदायाने उत्साहात घोषणा देऊन स्वागत केले. अनेक ठिकाणी हात उंचावून मोदींनी त्यांना अभिवादनही केले. पण त्यांना निदर्शनांनाही सामोरे जावे लागले. १०, डाऊनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरही त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली.
द गार्डीयन या वृत्तपत्रात अनिश कपूर यांनी लिहिलेल्या इंडिया इज रुल्ड बाय हिंदू तालिबान (भारतावर सध्या हिंदू तालिबान राज्य करत आहे) या लेखामुळे पहिल्याच दिवशी माध्यमांत वादळ उठले. तर मोदींची युके भेट हा हॅश टॅग टिष्ट्वटरवर सर्वांत जास्त लोकप्रिय झाला. जागतिक ट्रेंड्समध्येही हा हॅश टॅग काही काळ सर्वांत वरच्या स्थानावर होता. अर्थात मोदींच्या विरोधातही हजारो टिष्ट्वट्स करण्यात येत होते.
१३ अब्ज डॉलर्सचे करार
पहिल्याच दिवशी १३ अब्ज डॉलर्सचे करार झाल्यामुळे या लंडन भेटीची उपयुक्तता मोठी असणार हे निश्चित झाले आहे.
१८,००० गावांना वीज
भारतातील १८,००० गावांना वीज देण्याची घोषणा यावेळी मोदी यांनी केली.
अहमदाबाद ते लंडन विमान
अहमदाबाद ते लंडन विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू करणार असल्याचे मोदी यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला.
क्षणचित्रे
वेम्बले स्टेडियममध्ये ६० हजार नागरिकांना केले संबोधित
मोदींच्या स्वागतासाठी ६०० पेक्षा जास्त कलाकारांची हजेरी. यात १८० शाळकरी मुलांचा समावेश
देखी हैं सारी दुनिया..., जय हो सारख्या गीतांनी उपस्थितांच्या उत्साहाला उधाण
डोळे दीपवणाऱ्या आतषबाजीने मोदींचे स्टेडियममध्ये स्वागत
‘यूके वेलकम मोदी’चे भव्य डिजिटल बॅनर ठिकठिकाणी लक्ष वेधून घेत होते.
गरबा, भांगडा या भारतीय नृत्यही यावेळी सादर करण्यात आली.
कनिका कपूर , नवीन कुंद्रा , जे सिन, आलिशा चिनॉय यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.
पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुनही मोदींसमवेत व्यासपीठावर
शस्त्रास्त्रात भारत बडा प्लेअर
शस्त्रास्त्र क्षेत्रातील बड्या कंपन्याही भारतासोबत हातमिळवणी करण्यासाठी आमच्या दरवाजापर्यंत आले आहेत. देशाच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला शस्त्रसज्ज व्हावे लागेल.
१९ कोटी बँक खाती
देशातील ४० टक्के लोकांकडे बँक अकाऊंट नव्हते. आम्ही गरिबांसाठी योजना सुरू केली आणि १९ कोटी नवी बँक खाती सुरू झाली, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
> दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग जगापुढील सर्वात मोठी समस्या आहे.
> भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे.
> जो देश तरु ण आहे, तो देश विकासाच्या स्पर्धेत मागे राहणार नाही.
.> श्यामजी कृष्ण वर्मांची शेवटची इच्छा डेव्हिड कॅमेरून यांनी पूर्ण केली.
> रेल्वेचा खूप जलद गतीने विकास होत आहे. रेल्वेमध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) केली आहे.
> भारतात आज स्वच्छता हे एक आंदोलन बनले आहे, देशाला अस्वच्छतेपासून मुक्त करणे हे माझे स्वप्न.
पंतप्रधान कॅमेरून यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
> केम छो वेम्बले! बोलून भाषणाची सुरुवात गुजरातीतून केली.
> भारतात अच्छे दिन जरूर येणार.
> भारताला संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठी पाठिंबा.
> ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा पंतप्रधान होण्याचा दिवस दूर नाही.