‘भारताने इस्लामिक देशांसमोर झुकण्याची गरज नाही’, बड्या देशातून उठला पाठिंब्याचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 03:35 PM2022-06-07T15:35:00+5:302022-06-07T15:38:59+5:30
Nupur Sharma Issue: भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत अनेक इस्लामिक देशांनी भारताकडे माफीची मागणी केली आहे. दरम्यान, इस्लामिक देशांकडून टीका होत असताना नेदरलँडमधील एका खासदारांनी भारताच्या समर्थनार्थ केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे.
अॅम्स्टरडॅम - मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून इस्लामिक देशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सध्या भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत अनेक इस्लामिक देशांनी भारताकडे माफीची मागणी केली आहे. दरम्यान, इस्लामिक देशांकडून टीका होत असताना नेदरलँडमधील एका खासदारांनी भारताच्या समर्थनार्थ केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. नेदरलँडमधील खासदार आणि पार्टी फॉर फ्रीडमचे अध्यक्ष गीर्ट विल्डर्स यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत विल्डर्स म्हणाले की, अरब आणि इस्लामिक देश भारतीय नेत्याच्या एका विधानावर एवढी प्रतिक्रिया देत आहेत, ही बाब हास्यास्पद आहे. या प्रकरणात भारताला माफी मागण्याची काहीही गरज नाही.
ते म्हणाले की, भारताने इस्लामिक देशांच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. लांगुलचालनाचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे परिस्थिती अधिकच वाईट होऊन जाते. त्यामुळे भारतातील माझ्या मित्रांनी इस्लामिक देशांना घाबरू नये. स्वातंत्र्यासाठी उभे राहावे.खासदार गीर्ट विल्डर्स हे नेदरलँड्समधील उजव्या विचारसरणीचे नेते आहे. ते म्हणाले मोहम्मद पैगंबर यांच्या नावावर मला दररोज मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. धमकदी दिल्याने काहीही साध्य होणार नाही. मी सत्य बोलणं बंद करणार नाही.
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही शोमध्ये केलेल्या विधानावरून या सगळ्या वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा आणि दिल्लीतील मीडियाप्रमुख नवीन कुमार जिंदल यांच्यावर कारवाई केली होती. नुपुरू शर्मांच्या त्या विधानावर अनेक इस्लामिक देशांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यामध्ये इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, यूएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीनेही या या विधानावर आक्षेप घेतला होता.