भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 06:43 PM2024-10-11T18:43:43+5:302024-10-11T18:45:07+5:30
इस्त्रायल आणि हमासमध्ये काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. आता या युद्धात इराणनेही उडी घेतली आहे. दरम्यान, ब्लू लाइनवरील वातावरणही बिघडले आहे.
गाझामध्ये आज झालेल्या जमिनीवरील चकमकीत तीन इस्रायली सैनिक मारले गेले आहेत. अशातच इस्रायलने आज लेबनानमधील भारतीय सैनिक असलेल्या ठिकाणी रणगाड्यांनी हल्ला केला आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांत खळबळ उडाली आहे. हिजबुल्लाहविरोधात उघडलेल्या मोहिमेत इस्रायली सैन्याला जमिनीवर पुढे जाता येत नाहीय. हिजबुल्लाचे दहशतवादी इस्रायली सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी इस्रायलने रणगाडे घुसविल्याचे वृत्त आहे. भारताने आज ब्लू लाइनवरील वाढत्या सुरक्षा परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
इस्त्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांच्या तीन तळांवर गोळीबार केला, यामुळे शांती सैनिक लेबनॉनमध्ये अडकले. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे हे वक्तव्य समोर आले आहे.
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'यूएन परिसराच्या अभेद्यतेचा सर्वांनी आदर केला पाहिजे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षकांची सुरक्षा आणि त्यांच्या आदेशाचे पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी योग्य पावले उचलली पाहिजेत.
'गेल्या काही दिवसांत, आम्ही नाकोरा आणि इतर भागात इस्रायलकडून लेबनॉनमध्ये घुसखोरी पाहिली आहे,' असे निवेदनात म्हटले आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसच्या सैनिकांची लेबनॉनमध्ये हिजबुल्लाशी चकमक झाली आहे.
१२० किलोमीटरची ब्लू लाईन संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेली सीमांकन रेषा आहे. ही लाईन दाखवते की, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेतले आहे. हे लेबनॉनला इस्रायल आणि गोलान हाइट्सपासून वेगळे करते, पण अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा नाही.