कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 02:45 PM2024-11-14T14:45:05+5:302024-11-14T14:46:39+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सन्मानांच्या यादीत लवकरच आणखी एका सन्मानाची भर पडणार आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सन्मानांच्या यादीत लवकरच आणखी एका सन्मानाची भर पडणार आहे. कॅरेबियन देश डॉमिनिकाने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्याची घोषणा केली आहे. या सन्मानाची घोषणा करताना डॉमिनिका सरकारने म्हटले की, पीएम मोदींनी कोरोना(Covid 19) महामारीच्या काळात डॉमिनिकाला खूप मदत केली होती. त्या मदतीची परतफेड म्हणून डोमिनिका पीएम मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करत आहे.
19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जॉर्जटाउन, गयाना येथे होणाऱ्या इंडिया-कॅरिकॉम समिटमध्ये डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, फेब्रुवारी 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी कोरोना महामारीच्या काळात AstraZeneca Covid-19 लसीचे 70 हजार डोस डॉमिनिकाला पाठवले होते. यामुळे डॉमिनिकामधील हजारो नागरिकांचा जीव वाचलाच, पण त्यांना आपल्या शेजारील देशांनाही मदत करता आली.
The Commonwealth of Dominica will bestow its highest national award, the Dominica Award of Honour, upon PM Narendra Modi (@narendramodi), in recognition of his contributions to Dominica during the COVID-19 pandemic and his dedication to strengthening the partnership between India… pic.twitter.com/7zNvTCSmfa
— Press Trust of India (@PTI_News) November 14, 2024
'पंतप्रधान मोदी खरे मित्र'
या सन्मानाची घोषणा करताना डॉमिनिका सरकार म्हणाले की, हा पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवा, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डॉमिनिकाला भारताने दिलेल्या पाठिंबा दर्शवतो. पंतप्रधान मोदी हे डॉमिनिकाचे खरे मित्र आहेत. आमच्या गरजेच्या वेळी, विशेषत: जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी त्यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.
पंतप्रधान शिखर परिषदेत भाग घेणार
हा पुरस्कारा स्वीकारताना पीएम मोदींनी हवामान बदल आणि भू-राजकीय संघर्षांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. डॉमिनिका आणि कॅरिबियन देशांसोबत एकत्र काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी सांगितले. डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन आणि पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट भारत-CARICOM शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. भारत आणि CARICOM सदस्य देशांमधील सहकार्यासाठी सामायिक प्राधान्यक्रम आणि नवीन संधी यावर चर्चा करण्याचे हे व्यासपीठ आहे.
पंतप्रधान मोदींना आतापर्यंत हे सन्मान मिळाले
>पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान मोदींना मे 2023 मध्ये त्यांचा सर्वोच्च 'ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' पुरस्कार दिला होता.
> फ्रान्सनेही 13 जुलै 2023 रोजी पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' देऊन सन्मानित केले.
> पीएम मोदींना 25 ऑगस्ट 2023 रोजी ग्रीसकडून 'द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' मिळाला.
> तसेच, पीएम मोदींना 2019 मध्ये बहरीनच्या राजाने 'किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स' सन्मान दिला होता. याशिवाय पीएम मोदींचा अनेक देशांनी सन्मान केला आहे.