भारताचे व्हिएतनामला ५0 कोटी डॉलर
By admin | Published: September 4, 2016 12:47 AM2016-09-04T00:47:39+5:302016-09-04T00:47:39+5:30
भारत व व्हिएतनाम यांच्यात लष्करी सहकार्य वाढावे यासाठी भारताने व्हिएतनामला ५00 दशलक्ष डॉलरची मदत शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या व्हिएतनामच्या
हनोई : भारत व व्हिएतनाम यांच्यात लष्करी सहकार्य वाढावे यासाठी भारताने व्हिएतनामला ५00 दशलक्ष डॉलरची मदत शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर असून, त्यांनीच अर्थसाह्याची घोषणा केली. दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढलेल्या वावराच्या पार्श्वभूमीवर १२ करारांवरही दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गस्ती नौकांच्या निर्मितीचा करारही त्यात आहे.
हा दौरा आटोपून मोदी रविवारी चीनला जात असून, तिथे राष्ट्राध्यक्ष ली पेंग यांना भेटणार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे पंतप्रधान न्गुयेन शियान फुक यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर मोदीं यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्ही देशांनी संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे. यामुळे द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा, गती आणि वास्तविक आयाम मिळेल.
या आधी व्हिएतनामचे लष्करी करार रशिया आणि चीन यांच्यासोबतच झाले आहेत. मोदी यांनी सांगितले की, व्हिएतनामसोबत संरक्षण क्षेत्रासोबतच माहिती तंत्रज्ञान, अंतरिक्ष, सायबर सुरक्षा आणि जहाजबांधणी या क्षेत्रातही आदानप्रदान केले जाईल. (वृत्तसंस्था)
मोदी यांचे व्हिएतनाममध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. मोदी यांनी हानोईमधील जगप्रसिद्ध पॅगोडा मंदिराला, तसेच महान व्हिएतनामी नेते हो ची मिन्ह यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या बांबूच्या घराला भेट दिली.
व्हिएतनामचे पंतप्रधान न्गुयेन जुआन फुक यांच्यासोबत मासे पकडण्याचा आनंद त्यांनी लुटला. मोदी यांनी न्हा ट्रेंग विद्यापीठात सॉफ्टवेअर पार्क स्थापन करण्यासाठी ५0 लाख डॉलरची मदत जाहीर केली.