'भारतात ना शुद्ध हवा ना स्वच्छ पाणी', ट्रम्प यांनी वाजवली अमेरिकेचीच टिमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:58 PM2019-06-06T15:58:09+5:302019-06-06T16:09:27+5:30
अमेरिका जगातील सर्वात स्वच्छ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आकडेवाडीवरुही ही बाब सिद्ध झाली आहे.
वाशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी नसल्याचे म्हटले आहे. भारतासह रशियाही प्रदूषणास जबाबदार असल्याचे मत ट्रम्प यांनी बोलून दाखवले आहे. जागतिक पर्यावरणाचा विचार करून हे दोन्ही देश आपली जबाबदारी पार पाडत नाहीत. शिवाय या देशांना प्रदुषणासंदर्भातील जबाबदारीचे भानही नसल्याचे ट्रम्प यांनी एका इंग्रजी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
अमेरिका जगातील सर्वात स्वच्छ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आकडेवाडीवरुही ही बाब सिद्ध झाली आहे. पण, भारत, चीन आणि रशिया या देशांमध्ये स्वच्छता आणि प्रदुषणाच्या समस्येकडे गंभीरतेने पाहिले जात नाही. या देशांमध्ये प्रदुषण आणि स्वच्छतेची समजही नाही. भारतासह अन्य काही देशांमध्ये शुद्ध हवाही मिळत नाही. तर स्वच्छ पाणीदेखील उपलब्ध होत नाही. आपण तेथील काही शहरांमध्ये गेल्यास तुम्ही तेथे श्वासही घेऊ शकणार नाहीत. मी या शहरांची नावे घेऊ शकतो, पण मी ती घेणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डोनाल्ड ट्रम्प यांनी एका इंग्रजी न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी, जगातील पर्यावरण आणि अमेरिका यासंदर्भात भाष्य केले. यावेळी, ट्रम्प यांनी भारतातील अस्वच्छता आणि प्रदुषणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन, ट्रम्प यांनी एकप्रकारे भारताची जगभरात बदनामी करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून येते.