"भारताला कुठलीही विशेष सूट नाही"; कॅनडाच्या आरोपावर अमेरिकेने घेतली कठोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 12:43 PM2023-09-22T12:43:15+5:302023-09-22T12:43:48+5:30
आम्ही आमच्या मूलभूत तत्त्वांवर ठाम राहू. आमचा जवळचा मित्र कॅनडा त्याच्या तपास आणि मुत्सद्दी प्रक्रियेचा पाठपुरावा करत असताना त्याच्यासोबतही आम्ही काम करू असं सुलिव्हन यांनी प्रत्युत्तरात म्हटलं.
नवी दिल्ली – कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर लावलेल्या आरोपावरून आता अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्याकांडात भारताचा हात आहे असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी अमेरिकेने भारताला कुठलीही विशेष सूट मिळणार नाही असं म्हटलं आहे. कोणताही देश प्रभावित झाला तरी अमेरिका आपल्या मूलभूत तत्त्वांसाठी उभी राहील असं अमेरिकेचे राष्ट्रीय सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत सुलिव्हन म्हणाले की, कॅनडाच्या आरोपांबद्दल अमेरिका खूप चिंतेत आहे. या आरोपाचा तपास झाला पाहिजे या मागणीला आमचे समर्थन आहे. दोषींना न्यायाच्या चौकटीत उभे केले जावे असं अमेरिकेला वाटते. त्यावर पत्रकारांनी अध्यक्ष जो बिडेन या विषयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलतील का आणि या वादामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांना धोका निर्माण होऊ शकतो का? असे प्रश्न सुलिव्हन यांना विचारले.
त्यावर खासगी राजनैतिक चर्चेबद्दल बोलायचे नाही परंतु अमेरिका या मुद्द्यावर उच्च पातळीवर भारतीय अधिकार्यांच्या संपर्कात आहे. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतली आहे. आम्ही काम करत राहू आणि कोणत्याही देशाची पर्वा न करता आम्ही ते करू. अशा कामासाठी कोणालाही कोणतीही विशेष सूट दिली जाणार नाही. देश कोणताही असो, आम्ही आमच्या मूलभूत तत्त्वांवर ठाम राहू. आमचा जवळचा मित्र कॅनडा त्याच्या तपास आणि मुत्सद्दी प्रक्रियेचा पाठपुरावा करत असताना त्याच्यासोबतही आम्ही काम करू असं सुलिव्हन यांनी प्रत्युत्तरात म्हटलं.
कॅनडासोबत मतभेदावर काय म्हणाले अमेरिकन अधिकारी?
नुकताच एक अहवाल समोर आला होता ज्यामध्ये अमेरिका कॅनडाच्या या प्रकरणात पडण्याचे टाळत आहे. आणि त्यापासून अंतर राखतेय असं म्हटलं होते. या प्रकरणी अमेरिका भारतावर टीका करण्याचे टाळत असल्याचे अहवालात म्हटले आहे. हे वृत्त अमेरिकन अधिकारी सुलिव्हन यांनी फेटाळत 'मी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न मीडियामध्ये पाहिले आहेत. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात मतभेद आहेत हे मी स्पष्टपणे नाकारतो. आम्ही आरोपांबद्दल खूप चिंतित आहोत. तपास पुढे जावा आणि दोषींवर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे. हा आरोप उघडकीस आल्यापासून अमेरिकेने तपास पूर्ण होईपर्यंत आपला पूर्ण पाठिंबा कायम ठेवला आहे असं अमेरिकने म्हटलं.