भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:35 IST2025-03-08T09:35:14+5:302025-03-08T09:35:36+5:30
भारतासोबतच अमेरिका रशियावरही कर लादणार आहे. जोवर रशिया युक्रेनसोबत शांती समझोता करण्यास तयार होत नाही तोवर अमेरिका रशियावर जादा टेरिफ आकारणार आहे.

भारत झुकला? जादा आकारत असलेल्या टेरिफमध्ये कपात करण्यास तयार झाला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवर अधिकचा कर लावणार असल्याची घोषणा केली होती. १ एप्रिलपासून हा कर लादला जाणार होता, जे देश अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर आकारतात त्यांच्यावर हा कर आणला जात होता. आता भारत जादाचा कर कमी करण्यास तयार झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी भारत हा श्रीमंत देश आहे, त्यांना मदत देण्याची गरज नाही असे म्हटले होते. तसेच भारत हा अमेरिकेच्या उत्पादनांवर १०० टक्क्यांहून अधिकचा कर लावत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यामुळे अमेरिकी कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले होते.
कोणीतरी त्यांची ही वागणूक जगजाहीर करत असल्याने भारत हा कर कमी करण्यासाठी तयार झाल्याचे ट्रम्प यांनी अमेरिकी सिनेटला सांगितले आहे. भारतासोबतच अमेरिका रशियावरही कर लादणार आहे. जोवर रशिया युक्रेनसोबत शांती समझोता करण्यास तयार होत नाही तोवर अमेरिका रशियावर जादा टेरिफ आकारणार आहे. संभाव्य तिसऱ्या युद्धाला लवकरात लवकर संपविण्याची गरज आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. आपल्या देशाला आर्थिक आणि व्यापारी आघाडीवर लुटण्यात आले आहे. ते आता थांबेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
युरोपियन युनियनने शुल्क आकारणीबाबत खूप वाईट वागणूक दिली आहे. मला ब्रिटनशी व्यवहार करणे कठीण जात आहे, त्यांच्याकडे कोणतेही कार्ड नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांच्या वागण्याविरोधात आता युरोपियन देशही एक होऊ लागले आहेत. याचा फटका भविष्यात अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. आधीच रशिया, चीन, भारतासारख्या मोठ्या देशांविरोधात ट्रम्प यांनी टेरिफ वॉर छेडले आहे.