नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 11:51 AM2023-10-08T11:51:31+5:302023-10-08T11:51:51+5:30

जपान येथे ‘इंडिया मेला’ कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कलावंतांचे आकर्षक सादरीकरण

India-Japan friendship will strengthen under the able leadership of Narendra Modi; Mungantiwar expressed his belief | नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास

नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास

googlenewsNext

कोवे (जपान): ‘इंग्रजी वर्णाक्षरांमध्ये ‘आय’ आणि ‘जे’ ही दोन अक्षरे जवळ आहेत. ‘आय’ म्हणजे इंडिया आणि ‘जे’ म्हणजे जपान. वर्णाक्षरांप्रमाणेच इंडिया आणि जापानही एकमेकांच्या जवळ आहेत. ‘इंडिया मेला’च्या निमित्ताने या दोन्ही देशांमधील सौहार्द, मैत्रीभाव घट्ट होऊन एकत्रीतपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील,’ असा विश्वास व्यक्त करून विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत आणि जपानमधील ही मैत्री अधिक दृढ होईल अशी खात्री महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. जपान येथील कोबे शहारात भारत-जपान यांच्यातील कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित ‘इंडिया मेला’ या कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. 

ते म्हणाले, सर्वात आधी सूर्याची किरणे जपान या देशावर पडतात; सर्वप्रथम सूर्यदर्शन होणारा हा देश आहे. आमचा भारत जेथे कोणार्कला सूर्य मंदिर आहे, नेहमीच सूर्यपूजक जपानशी मैत्रीपूर्ण संबंध जपून ठेवत आला आहे. अध्यात्मिक दृष्टीकोनातून भारत आणि जपान यांच्यात अतिशय प्रेमाचे संबंध राहिले आहेत. ‘युद्ध नको बुद्ध हवा’ अर्थात ‘जियो और जिने दो’, असा संदेश देणारे बुद्धिझम भारतातून जपानमध्ये आले आहे; हा विचार जपानच्या घराघरात आणि मनामनात पोहोचविण्याचा जपानने सातत्याने प्रयत्न केला आहे; ज्यात त्यांना यश आले आहे.’ 

ओघवत्या हिंदी भाषेत आणि त्यांच्या विशेष शैलीत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘मला यासाठी जपान या देशाचे आकर्षण असण्याचे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे, भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी लढणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना साथ देणारा हा देश आहे. टोकीयो शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं मंदिर याची साक्ष देत असून मला याबद्दल जपानचा आदर आणि अभिमान वाटतो.’ संस्कृती आणि परंपरा ही जीवन जगण्याची कला आहे. धन माणसाच्या भौतिक समाधानाचे साधन आहे तर संस्कृती हे मनाच्या समाधानाचे उत्तम साधन आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघ देखील कोणता देश किती धनवान आहे यापेक्षा तो किती गुणवान आहे या आधावर त्या देशाच्या आनंदाची व्याख्या निश्चित करीत आहे, असेही ते म्हणाले.  

मुनगंटीवार यांची जपानी भाषेत भाषणाची सुरुवात

भाषणाची सुरुवात जपानी भाषेत सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवत ना.मुनगंटीवार यांचे स्वागत करत प्रतिसाद दिला. यावेळी आपल्या भाषणात मुनगंटीवार म्हणाले जपानी बांधवांना  भेटण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद झालाय, सर्वांशी संवाद साधण्याचे सौभाग्य प्राप्त झाले याचे समाधान वाटत आहे.

महाराष्ट्राचा अभिमान

जगात १९३ राष्ट्र आहेत, परंतु महाराष्ट्र मात्र एकच आहे, आणि तो आमचा आहे, याबद्दल अभिमान आहे, या शब्दांत मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या संस्कृतीक कार्यक्रमांचे जपानमध्ये सादरीकरण झाल्याचा मला राज्याचा मंत्री म्हणून मनापासून आनंद झाला आहे. महाराष्टाच्या कलाकारांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रम सादर केले, त्यांचे मी अभिनंदन करतो: त्यांच्या कार्यक्रमामुळे जपान च्या कोबे शहरातील कला रसिकाच्या चेहऱ्यावरील आनंद व उत्साह बघून खूप आनंद वाटतोय असेही ते म्हणाले.

Web Title: India-Japan friendship will strengthen under the able leadership of Narendra Modi; Mungantiwar expressed his belief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.