पाकव्याप्त काश्मीरवर पुढील आठ-दहा दिवसांत भारत हल्ला करण्याची शक्यता; पाकिस्तानला धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:23 PM2019-09-25T15:23:26+5:302019-09-25T15:25:13+5:30
काश्मीरच्या विभाजन आणि 370 रद्द करण्यावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता.
नवी दिल्ली : भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी नुकताच बालाकोटमध्ये पाकिस्ताननेदहशतवादी तळ पुन्हा सक्रीय केल्याचा आरोप केला होता. तसेच गेल्या आठवड्यातच त्यांनी पीओकेही कधीही ताब्यात घेऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. यावरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर भ्याड हल्ला करत 40 जवानांना शहीद केले होते. यामुळे भारताने लगेचच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील बालाकोटमध्ये हवाई हल्ला करून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा तळ उद्धवस्त केला होता. तसेच वर्षभरापूर्वी सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.
काश्मीरच्या विभाजन आणि 370 रद्द करण्यावरून पाकिस्तान भारताला युद्धाची धमकी देत होता. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही अणुयुद्धाची धमकी दिली होती. मात्र, अमेरिकेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या मुलाखतीवरून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. तेथील नेते आणि विशेषज्ञ घाबरलेल्या अवस्थेत आहेत. पुढील काही दिवसांत दहशतवादाचे नाव घेऊन भारत पीओकेवर हल्ला करणार असल्याची भीती त्यांना सतावत आहे.
मंगळवारी पाकिस्तानच्या जिओ टीव्हीवरील एका कार्यक्रमात तेथील सर्वोच्च न्यायालयाचे वकील अक्रम शेख यांनी भारत एका आठवड्यात किंवा १० दिवसांत पीओकेवर हल्ला करू शकतो असे म्हटले आहे. ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील जुगलबंदी पाहता भारत अमेरिकेच्या मदतीने पीओकेवर हल्ला करू शकतो. आता भारत बचावाच्या पवित्र्याऐवजी आक्रमक निती अवलंबेल. तेच त्यांच्यासाठी चांगला बचाव असल्याचे शेख यांनी म्हटले. या चर्चेमध्ये मोहम्मद अली शेख, खुर्शीद महमूद कुरैशी देखिल सहभागी होते.
तर कुरैशी यांनी सांगितले की, पाकिस्तान कोणत्याही प्रकारे भारताशी युद्धाला समर्थ आहे. पाककडे स्वत: विकसित केलेले रणगाडे आणि युद्धसामग्री आहे. तर भारताकडे 44 वर्ष जुनी विमाने आहेत. यामुळे पाकिस्तान भारतापेक्षा ताकदवान असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.