"पॅलेस्टाईन नागरिकांच्या हत्येच्या विरोधात, युद्धाच्या संकटावर शांततापूर्ण तोडगा निघावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 12:18 AM2023-10-11T00:18:27+5:302023-10-11T00:19:10+5:30
याचदरम्यान भारताने या युद्धात हस्तक्षेप करावा अशीही मागणी
Israel Hamas War, Palestine: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर इस्रायलने युद्ध थांबवले नाही तर ओलिस ठेवलेल्या नागरिकांना मारून टाकू, असे हमासने म्हटले आहे. हमासने ओलिस ठेवलेल्यांना सुरूंग खणून त्यात लपवून ठेवले आहे. तसेच नेपाळचे १०, युक्रेनचे २, फ्रान्सचे २ आणि कंबोडियाच्या एका नागरिकाचा इस्रायलमध्ये मृत्यू झाला आहे. तशातच इराण स्पष्ट केले की ते हमासला मदत करत नाहीत. अशा वेळी पॅलेस्टाईनच्या नेत्याने स्पष्ट केले आहे की आमच्या देशाला नागरिकांच्या हत्या अमान्य आहेत. आम्ही याच्या विरोधात आहोत, आम्हाला शांततामय मार्गाने याचा तोडगा काढायचा आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दरम्यान, पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अबू अलहैजा यांनी भारताला विनंती केली आहे. भारत हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांचा मित्र देश आहे आणि गाझा पट्टीतील सध्याचे संकट सोडवण्यासाठी भारताने हस्तक्षेप केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. पॅलेस्टाईन नागरिकांच्या हत्येच्या विरोधात असून या संकटावर शांततापूर्ण तोडगा निघावा, असे अबू अलहैजा यांनी सांगितले. आमचे राष्ट्रपती याबाबत अनेक युरोपीय देशांच्या संपर्कात आहेत. भारत हा इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांचा मित्र आहे. अशा परिस्थितीत भारताने यात हस्तक्षेप करून यावर तोडगा काढण्यास मदत करावी अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, हे युद्ध सुरू असतानाच हमासने इस्लामिक देशांची बैठक बोलावली आहे. एवढेच नाही तर अमेरिका इस्रायलला मदत करत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, आम्हाला युद्ध नको होते पण हमासने आपल्या देशाविरुद्ध ज्या पद्धतीने कृती केली ते युद्ध होते आणि कोणत्याही सार्वभौम देशाला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. या सगळ्यामध्ये इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 900 इस्रायली नागरिकांसह 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे.