भारत-पाक वाद मिटणार, अमेरिका मध्यस्थी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 02:08 PM2019-02-28T14:08:06+5:302019-02-28T14:34:17+5:30
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे.
वॉशिंग्टन- भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यातच पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान उघडा पडला आहे. रशिया, अमेरिकेसारख्या देशांनीही भारताला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढता तणाव निवळण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेलं तणावाचं वातावरण लवकरच संपुष्टात आलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की दोन्ही देशांमधील तणाव लवकरच निवळेल, अनेक वर्षांपासूनचा असलेला हा वाद लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
US Pres Donald Trump: I think reasonably attractive news from Pakistan and India, they have been going at it and we have been involved and have them stop, we have some reasonably decent news,hopefully its going to be coming to an end, going on for a long time,decades and decades pic.twitter.com/7q5CrMWLsj
— ANI (@ANI) February 28, 2019
तत्पूर्वी पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत, अशी रोखठोक भूमिका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी बुधवारी घेतली होती. त्यानंतर, रात्री उशिरा अजित डोवाल यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं कळतं. अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी राहणं, हे पाकिस्तानला झेपणारं नाही. त्यामुळे हेच ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न भारत करताना दिसतोय. भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला अनेक मोठ्या देशांनी पाठिंबा दिला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, असा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दिला आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आलीय. हे भारतासाठी मोठं यश आहे आणि पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा. वास्तविक, या बड्या देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. परंतुअमेरिकेसह रशिया, जपान, इस्रायल, ऑस्ट्रेलिया यासारखे बलाढ्य देशांनी भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे.