भारत आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत; पाकिस्तानला सतावतेय भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 08:01 AM2020-06-25T08:01:45+5:302020-06-25T08:06:19+5:30
भारत 'फॉल्स फ्लॅश ऑपरेशन'ची तयारी करत असल्याचा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा
इस्लामाबाद: चीनसोबतचे संबंध ताणले गेल्यानं भारतानं लडाख सीमेवरील फौजफाटा वाढवला आहे. चीनकडून होणाऱ्या कुरघोड्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. मात्र पाकिस्तानला वेगळीच भीती सतावत आहे. चीनसोबतच्या सीमावादारून विरोधकांचं लक्ष हटवण्यासाठी भारत आमच्यावर हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशींनी व्यक्त केली आहे. भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भारतानं नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचे आदेश नुकतेच दिले. पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील दोन कर्मचारी हेरगिरी करताना आढळल्यानं भारताकडून हे आदेश देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी 'जियो पाकिस्तान' वृत्तवाहिनीशी संवाद साधला. 'चीनसोबतच्या सीमावादावरून लक्ष हटवून ते पाकिस्तानवर केंद्रीत व्हावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत,' असं कुरेशी म्हणाले.
भारत पाकिस्तानविरोधात फॉल्स फ्लॅश ऑपरेशन (कारवाई करणाऱ्या देशाची ओळख गुप्त राहील अशा प्रकारची मोहीम) करण्यासाठी संधी शोधत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतीही ठोस माहिती किंवा पुरावा दिला नाही. 'गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. त्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत आणि सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणं अवघड जातं आहे,' असं कुरेशी पुढे म्हणाले.
पाकिस्तानवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. 'नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले हेरगिरीचे आरोप बिनबुडाचे आहेत. उलट भारताकडूनच त्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला गेला. त्यांच्या गाड्यांचा पाठलाग करण्यात आला. आम्ही भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना समन्स बजावलं असून त्यांनाही तशीच वागणूक दिली जाईल, असा इशारा दिला आहे,' असं कुरेशी म्हणाले.
चर्चेच्या नावाखाली चीननं पुन्हा दिला भारताला दगा; गलवानवर केला दावा
‘त्या’ जवानांना लष्करप्रमुख नरवणे यांच्याकडून शाबासकी