इंडिया पाकिस्तान कसोटी मालिका इंग्लंडमध्ये होणार?
By admin | Published: November 25, 2015 02:56 PM2015-11-25T14:56:45+5:302015-11-25T14:56:45+5:30
इंडिया पाकिस्तान यांच्यामधली बहुचर्चित कसोटी मालिका इंग्लंडमध्ये होण्याची शक्यता असून तशी औपचारीक घोषणा होणं बाकी असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयने दिलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. २५ - इंडिया पाकिस्तान यांच्यामधली बहुचर्चित कसोटी मालिका इंग्लंडमध्ये होण्याची शक्यता असून तशी औपचारीक घोषणा होणं बाकी असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं पीटीआयने दिलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर व पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांची दुबईमध्ये बैठक झाली असून श्रीलंकेमध्ये डिसेंबरमध्ये एकदिवसीय मालिका खेळायची आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळायची असा प्रस्ताव आहे.
पीटीआयने सूत्रांच्या हवाल्यानं असं म्हटलं आहे की भारताविरुद्ध श्रीलंकेमध्ये खेळण्यासाठी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे पीसीबीने परवानगी मागितली आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार २०१७ मध्ये पाकिस्तान भारताच्या दौ-यावर येणार असून त्याआधी पाकिस्तानला यजमानपद भूषवण्याची संधी देण्याची अट आहे. परंतु पाकिस्तानात सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने या मालिका श्रीलंका व इंग्लंडसारख्या त्रयस्थ देशांमध्ये खेळवण्याचा विचार आहे.
शशांक मनोहर व शहरयार खान यांच्यामध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष गाईल्स क्लार्क यांनी मध्यस्थी केली असून त्यांनीच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही देशांमधले क्रिकेटशी निगडीत संबंध बिघडण्याचे कारण बोर्डामधल्या गोपनीय वृत्तांना प्रसारमाध्यमांकडे पोचवण्यात आल्याचे मनोहर यांनी शहरयार खान यांना सांगितल्याचे कळते. त्यामुळे मनोहर व खान दोघेही जोपर्यंत संपूर्ण सहमती होत नाही तोपर्यंत मौन पाळणार आहेत.