भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारत 86 व्या स्थानी; सीपीआय २०२० जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 05:20 AM2021-01-30T05:20:55+5:302021-01-30T05:21:15+5:30
न्यूझीलँड, डेन्मार्क अग्रणी, शून्य गुण असलेल्या देशाला सर्वाधिक भ्रष्ट मानले जाते आणि शंभर गुण असलेल्या देशाला स्वच्छ मानले जाते.
नवी दिल्ली : सार्वजिनक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार जारी करण्यात आलेल्या २०२० च्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार (सीपीआय) भारत सहा पायऱ्यांनी खाली घसरत १८० देशांत ८६ व्या स्थानावर आला आहे.
ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक गुरुवारी जारी करण्यात आला. शून्य ते शंभर गुणांवरून १८० देशांतील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार १८० देशांची क्रमवारी जारी केली जाते. शून्य गुण असलेल्या देशाला सर्वाधिक भ्रष्ट मानले जाते आणि शंभर गुण असलेल्या देशाला स्वच्छ मानले जाते.
भारत ४० अंकांनी १८० देशांत ८६ स्थानी आहे. २०१९ मध्ये भारत १८० देशांत ८० व्या क्रमांकावर होता. २०१९ आणि २०२० मध्ये भारताचे भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात (सीपीआय) गुण समान आहेत. सीपीआय २०२० च्या अहवालानुसार भारत अजूनही भ्रष्टाचार निर्देशांकात खूप मागे आहे.
सोमालिया व दक्षिण सुदान १७९ व्या क्रमांकावर
यावर्षी न्यूझीलँड आणि डेन्मार्क ८८ अंकांनी पहिल्या स्थानी आहे. सोमालिया आणि दक्षिण सुदान १२ अंकांनी १७९ व्या क्रमांकावर आहे. कोविड-१९ केवळ आरोग्य आणि आर्थिक संकट नाही. हे भ्रष्टाचाराचेही संकट आहे. आपण मात्र ते हाताळण्यास अपयशी ठरत आहोत. भ्रष्टाचाराचे जास्त प्रमाण असलेल्या देशांनाही फार सक्षमपणे या आव्हानांचा मुकाबला करता आलेला नाही, असे ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचे प्रमुख डेलिया फरेरिया रुबिओ यांनी म्हटले आहे.