"हल्ले करणारे मोकाट आणि हक्क मागणाऱ्यांना..."; चिन्मय प्रभूंच्या अटकेवर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 04:27 PM2024-11-26T16:27:56+5:302024-11-26T16:31:24+5:30
बांगलादेशात चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.
Chinmoy Krishna Das Prabhu :बांगलादेशातील हिंदूंसोबत होणाऱ्या हिंसाचाराला विरोध करणाऱ्या इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाका येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आहे. चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेने जगभरात खळबळ उडाली आहे. चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेचा विरोध करत बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे.
हिंदू समुदायाला मजबूत कायदेशीर संरक्षण आणि अल्पसंख्यांकांना समर्पित मंत्रालयाच्या मागणीसाठी चिन्मय कृष्णा दास यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत चिन्मय कृष्णा दास बांगलादेशी पोलिसांनी अटक केली. या अटकेचा विरोध करत बांगलादेशमध्ये मोठ्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यामुळे आता चिन्मय प्रभूंच्या अटकेवर भारत सरकारची भूमिका समोर आली आहे. त्यांना जामीन न मिळाल्याने परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.
"बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अतिरेकी घटकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. तिथे अल्पसंख्याकांची घरे आणि व्यावसायिक संस्थांची जाळपोळ आणि लुटमार तसेच चोरी, देवता आणि मंदिरांची विटंबना असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पण या घटनांचे गुन्हेगार अजूनही मोकळेपणाने फिरत आहेत, हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे, शांततापूर्ण सभांद्वारे आपले हक्क मागणाऱ्या धर्मगुरूवर आरोप केले जात आहेत. चिन्मय दास यांच्या अटकेविरोधात आम्ही शांततेने विरोध करत आहोत. यासोबतच अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही आम्ही चिंता व्यक्त करतो. हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी आम्ही बांगलादेशच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो. यामध्ये त्यांचे शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही समावेश आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
Our statement on the arrest of Chinmoy Krishna Das:https://t.co/HbaFUPWds0pic.twitter.com/cdgSx6iUQb
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 26, 2024
चिन्मय प्रभूंच्या अटकेच्या निषेधार्थ कट्टरतावाद्यांच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या हिंदूंनी आज मेट्रोपॉलिटन कोर्टात एकत्र येऊन निदर्शने केली. मात्र यावेळी बांगलादेशी पोलिसांकडून हिंदू समाजाच्या लोकांवर अश्रुधुराचे नळकांडे आणि रबराच्या गोळ्या झाडण्यात आल्या.
दरम्यान, बांगलादेशातील न्यायालयाने मंगळवारी चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. कृष्णा दास यांना जामीन न मिळाल्याने त्यांच्या अनुयायांनी न्यायालयाच्या आवारात विरोधी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. बांगलादेश पोलिसांनी सोमवारी दासला ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून त्यांना अटक केली. कोर्टात हजर केले जात असताना चिन्मय दास यांनी बांगलादेशातील हिंदूंना आंदोलन सुरु ठेवण्यास सांगितले.