एस्सारच्या रिफायनरीला इराणचे तेल वापरण्यास भारताने केली मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 02:10 AM2018-12-14T02:10:51+5:302018-12-14T02:11:15+5:30
इराणचा दावा; अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांचा परिणाम
दुबई : अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे रशियातील एका रिफायनरीला इराणमधील आयात केलेले कच्चे तेल वापरण्यास भारताने मनाई केली आहे, अशी माहिती इराणचे तेलमंत्री बिजन जंगनेह यांनी दिली. इराणवर निर्बंध असल्याने तेथील कच्चे तेल वापरू नका, असे भारताने एस्सार कंपनीच्या रशियातील रिफायनरीला सांगितले, अशी इराणची तक्रार आहे.
इराणच्या सरकारी टीव्हीला दिलेल्या मुलाखती जंगनेह यांनी हे वक्तव्य केले. इराणने विदेशात रिफायनरीज का खरेदी केल्या नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर जंगनेह यांनी म्हटले की, त्यासाठी मोठी गुंतवणूक लागते, तसेच विदेशातील रिफायनरीज त्या देशाच्या नियंत्रणात असतात. तुम्ही एखादी रिफायनरी विदेशात खरेदी केली तरीही तिच्यावर तुमचे नियंत्रण नसते. ती ज्या देशात आहे तेथील सरकारचे तिच्यावर नियंत्रण असते.
इराणी तेलमंत्र्यांच्या वक्तव्यावर भारतीय अधिकाऱ्याची प्रतिक्रिया तात्काळ मिळू शकलेली नाही. रशियाच्या रॉसनेफ्ट कंपनीने
एस्सार आॅईलची रिफायनरी आणि ३,५०० इंधन पंप खरेदी केले आहेत. काही पायाभूत सुविधाही रॉसनेफ्टला मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी झालेला हा सौदा १२.९ अब्ज डॉलरचा होता. (वृत्तसंस्था)
तशी परवानगी फक्त भारतालाच
रशियाच्या एका कंपनीने भारतातील एस्सार रिफायनरी खरेदी केली. तथापि, या रिफायनरीला इराणचे कच्चे तेल घेऊ देण्याची परवानगी भारताने दिली नाही. वास्तविक इराणवरील निर्बंधांमधून भारताने स्वत:ला सवलत मिळवून घेतली आहे. तथापि, या सवलतीनुसार इराणकडून मिळविलेले कच्चे तेल भारत सरकारी मालकीच्या रिफायनरींसाठीच वापरत आहे. रशियन रिफायनरीला ते वापरण्याची परवानगी भारताने दिलेली नाही.