टेहळणी करणारे ड्रोन पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:04 AM2019-01-03T01:04:18+5:302019-01-03T01:04:41+5:30
बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.
इस्लामाबाद : बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.
या ड्रोन विमानाचे छायाचित्र पाकिस्तानी लष्कराच्या आंतरदलीय जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवर झळकवले. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या हद्दीत भारताच्या जवानांनाच नव्हे, तर त्यांचे ड्रोनही येऊ दिले जाणार नाही.
यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवर अशी कोणतीही घटना घडलेली नाही. भारताची चार ड्रोन विमाने गेल्या वर्षात पाडण्यात आली, असा दावाही पाकिस्तानी लष्कराने केला आहे.
काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या पाठिंब्यानेच हा हल्ला झालेला होता. त्यामुळे त्याच महिन्यात २९ सप्टेंबर रोजी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांच्या तळावर लक्ष्यभेदी हल्ला केला. जशास तसे उत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानने त्यावेळी भारताविरुद्ध खूप आकांडतांडव केले होते. (वृत्तसंस्था)
दहशतवादी कारवाया सुरूच
पाकिस्तानातून भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरूच राहिली आहे. ते काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवत असतात. पंजाबमध्येही खलिस्तान लिबरेशन फोर्सला हाताशी धरून आयएसआय या गुप्तहेर संघटनेने काही महिन्यांपूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणला.
या राज्यात दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे. सीमेवर त्या देशाचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय लष्करावर वारंवार गोळीबार करीत असतात. अशा स्थितीत टेहळणी करणारे भारतीय ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावाही पोकळ आहे, असे सूत्रांनी सांगितले.