अमेरिकसोबत मैत्री वाढली, पण...; भारतानं दूर केलं जिगरी मित्र रशियाचं टेन्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:15 PM2021-10-20T12:15:07+5:302021-10-20T12:15:48+5:30
भारत आणि रशियाची अनेक उद्दिष्टे समान आहेत. भारत अमेरिकेचा समावेश असलेल्या क्वाड देशांचा भाग असला तरी, रशियासोबत स्वतंत्रपणे काम करत राहील.
भारताचे डी बाला व्यंकटेश वर्मा हे मॉस्कोमध्ये राजदूत आहेत. त्यांनी भारत, अमेरिका (America) आणि रशियासंदर्भात (Russia) आपली भूमिका मांडली आहे. भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकीबद्दल रशियाने चिंता करू नये, कारण भारत आणि रशियाचे संबंध हे वैशिष्ट्यपूर्ण संबंध आहे. (India Russia Relation)
भारत-रशियाची अनेक उद्दिष्टे समान -
रशियाचे वृत्तपत्र कॉमर्सेंटशी बोलताना वर्मा म्हटले, भारत आणि रशियाची अनेक उद्दिष्टे समान आहेत. भारत अमेरिकेचा समावेश असलेल्या क्वाड देशांचा भाग असला तरी, रशियासोबत स्वतंत्रपणे काम करत राहील. आम्ही रशिया, भारत आणि चीनच्या (RIC) भागिदारीचीही मागणी केली आहे. भारत आपली सुरक्षितता आणि हिताच्या असलेल्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने सर्व पर्यायांचा वापर करेल, असेही ते म्हणाले.
भारत-रशिया संबंधांसंदर्भात बोलताना वर्मा म्हणाले, रशिया गेल्या अनेक वर्षांपासून भारताचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार आहे आणि 'मेक इन इंडिया' कार्यक्रमात सक्रिय भूमिका ही बजावली आहे. एस -400 सारखी एअर डिफेन्स सिस्टिम ही याच विश्वासाचा परिणाम आहे. त्याची पहिली डिलिव्हरी याच वर्षी होणार आहे.
तालिबानसंदर्भात मार्ग वेगळे, ध्येय एकच -
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य करताना, वर्मा म्हणाले, तालिबानच्या मुद्द्यावर भारत आणि रशियाचे मार्ग वेगवेगळे असले, तरी ध्येय एकच आहे. पीएम मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांच्यासह, दोन्ही देशांच्या शीर्ष मुत्सद्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात अनेक वेळा चर्चा केली आहे. आम्ही मॉस्को फॉर्मेटमध्ये सोबत बसून यासंदर्भात चर्चा करत आहोत. चीनसंदर्भात बोलताना वर्मा म्हटले, चीनने स्थित बदलण्याचा एकतर्फा प्रयत्न केला. या प्रकरणावर भारताला चर्चेद्वारे शांततापूर्ण तोडगा हवा आहे.