अमेरिकेचा हेतू 'तसा' नव्हता; S-400च्या करारानंतर ट्रम्प यांचा यू-टर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 08:36 PM2018-10-05T20:36:32+5:302018-10-05T20:57:23+5:30
भारत आणि रशियादरम्यान आज महत्त्वपूर्ण असलेल्या S-400 या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन- भारत आणि रशियादरम्यान आज महत्त्वपूर्ण असलेल्या S-400 या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी विरोध करणा-या अमेरिकेनं या प्रकरणावर अत्यंत मवाळ भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, रशियाच्या आडमुठ्या भूमिकेला पायबंद घालण्यासाठी बंदी घालण्याची धमकी दिली. रशियातील डिफेन्स सेक्टरमधील पैशाच्या प्रवाहाला थांबवलं पाहिजे. रशियावर बंदी घालण्याचा उद्देश मित्र देश आणि भागीदारांच्या सैन्य क्षमतेला डॅमेज करण्याचा नव्हता, आम्ही कोणतेही पूर्वग्रहदूषित ठेवून बंदी लादत नाही.
खरं तर गेल्या काही दिवसांपासून अमेरिका मित्र देशांना रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी केल्यास बंदी घालण्याची धमकी देत आहे. तरीही आज भारत आणि रशियानं एस-400 मिसाइल डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेनं स्वतःच्या भूमिकेत बदल केला आहे. तर काही दिवसांपर्यंत अशी चर्चा होती की, भारतानं जर रशियाशी हा करार केला तर अमेरिका नाराज होईल, अमेरिका शस्त्रास्त्र बंदीच्या कायद्या(CAATSA) चा वापर करून रशियाकडून इतर देशांना शस्त्रास्त्र खरेदी करण्यावर बंदी घालू शकते. परंतु असं काहीही झालं नाही. उलट अमेरिकेच्या स्वतःच्या भूमिकेवरून यू-टर्न घेतला आहे. भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाऊस येथे भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमधून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासंबंधीचे महत्त्वपूर्ण करार मार्गी लागले आहेत.
काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?
एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूच्या विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे. एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्यातील जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे. ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक स्वरूप आहे. अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.