भारताची मोठी दानत! युद्धादरम्यान पॅलेस्टाइनला पाठवली मदत, अन्न-औषधं घेऊन विमान रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 12:13 PM2023-10-22T12:13:01+5:302023-10-22T12:13:49+5:30
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगातील अनेक देशांनी गाझामधील लोकांसाठी मदत सामग्री पाठवण्याचं आवाहन केलं होतं.
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगातील अनेक देशांनी गाझामधील लोकांसाठी मदत सामग्री पाठवण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना फोन करून सीमा उघडण्याचं आवाहन केलं होते, जेणेकरून तेथील लोकांना मदत करता येईल. यानंतर सुमारे २० ट्रक मदत गाझाला पोहोचवण्यात आली आहे. आता भारतानं पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी मदत पाठवली आहे.
भारताने पॅलेस्टाईनमधील लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान इजिप्तच्या अल-अरिश आंतरराष्ट्रीय विमानतळावर मदत सामग्री घेऊन रवाना झालंय. भारतानं या विमानाद्वारे पॅलेस्टाईनमधील लोकांना सुमारे ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य पाठवलं आहे. जीवन रक्षक औषधं, सर्जिकल वस्तू, तंबू, स्लिपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता सेवा, पाणी शुद्ध करणारी औषधं यासह अनेक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.
#WATCH | Hindon Air Base, Ghaziabad (Uttar Pradesh) | An IAF C-17 flight carrying nearly 6.5 tonnes of medical aid and 32 tonnes of disaster relief material for the people of Palestine departs for El-Arish airport in Egypt.
— ANI (@ANI) October 22, 2023
The material includes essential life-saving… pic.twitter.com/HF5WJNAB58
राफा क्रॉसिंगद्वारे मदत
गाझा आणि इजिप्तमधील राफा सीमा ओलांडून ही मदत सामग्री पोहोचवली जाईल. इस्रायलनं गाझा पट्टीवर हल्ला केल्यापासून तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिथे लोकांना अन्न, पाणी, औषध आणि जीवनावश्यक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. मदत सामग्रीचा पहिला ट्रक गेल्या शनिवारी गाझा येथे पोहोचला, त्यानंतर आतापर्यंत सुमारे २० ट्रक तेथे पोहोचले आहेत. हमासनं दिलेल्या माहितीनुसार २० ट्रक मदत सामग्रीसह आले आहेत, ज्यांनी औषधं, वैद्यकीय पुरवठा आणि मर्यादित प्रमाणात अन्न आणल्याचं त्यांनी म्हटलं.