संयुक्त राष्ट्रात भारताचा दणदणीत विजय, चीनवर मात; ४ वर्षांसाठी स्टॅटिस्टीकल बॉडीत स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 08:41 AM2023-04-06T08:41:37+5:302023-04-06T08:43:14+5:30
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची ताकद सातत्यानं वाढत आहे.
संयुक्त राष्ट्रामध्ये भारताची ताकद सातत्यानं वाढत आहे. भारताची चार वर्षांसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च सांख्यिकी आयोगावर निवड झाली असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली. "भारताची १ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार्या ४ वर्षांच्या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च सांख्यिकी आयोगासाठी निवड झाली आहे. विजयाबद्दल अभिनंदन,” असं ट्वीट एस जयशंकर यांनी केलं.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या निवडणुकीत भारताला ५३ मतांपैकी ४६ मतं, दक्षिण कोरियाला २३ मतं, चीनला १९ आणि यूएईला १५ मतं मिळाली. भारताने या सर्व देशांना मागे टाकत हा विजय नोंदवला आहे. या निवडणुकीत २ जागांसाठी ४ उमेदवार होते.
India elected to the highest UN 🇺🇳 statistical body for a 4-year term beginning on 1 January 2024!
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 5, 2023
Congrats Team @IndiaUNNewYork for coming through so strongly in a competitive election.
सांख्यिकी, विविधता आणि लोकसंख्याशास्त्र या क्षेत्रातील भारताच्या कौशल्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगामध्ये भारताला स्थान मिळालं आहे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाची स्थापना १९४७ मध्ये करण्यात आली होती. ही साख्यिकीय प्रणालीची जगातील सर्वोच्च संस्था आहे.
या संस्थेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या २४ सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे, जे समान भौगोलिक वितरणाच्या आधारावर संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या वतीने निवडले जातात. याच्या सदस्यांमध्ये पाच आफ्रिकन देश, चार आशिया-पॅसिफिक प्रदेश, चार पूर्व युरोप, चार लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेश आणि पश्चिम युरोपमधील सात देशांचा समावेश आहे.