'पाकिस्तानात आरोपी घेताहेत 'फाइव्ह-स्टार' सुविधांचा लाभ', UN मध्ये भारताचा 'D-कंपनी'कडे इशारा, काय म्हणाले वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:51 PM2022-01-19T14:51:52+5:302022-01-19T14:52:44+5:30
संयुक्त राष्ट्रात (United Nations) भारताच्या राजदूतांनी १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुद्दा उचलून धरला.
संयुक्त राष्ट्रात (United Nations) भारताच्या राजदूतांनी १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुद्दा उचलून धरला. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाला जबाबदार असलेले आरोपी पाकिस्तानात आज फाईव्ह-स्टार सुविधांचा लाभ घेत आहेत आणि त्यांना सरकारी संरक्षण दिलं गेलं आहे, असं रोखठोक विधान संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत टी.एस.तिरुमूर्ती यांनी केलं आहे. तिरूमूर्ती यांचा रोख यावेळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याकडे होता.
'ग्लोबल काऊंटर-टेरिरिझम काऊन्सिल' मार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी कारवाई संमेलन २०२२'मध्ये भारतानं आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. दहशतवाद आणि देशांमधील संघटीत अपराध यांच्यातील संपर्काना ओळखणं गरजेचं आहे आणि त्यावर पूर्णपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं टी.एस.तिरूमूर्ती म्हणाले.
"१९९३ सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असणाऱ्या आरोपींच्या सिंडिकेट्सना ना केवळ सरकारी सुरक्षा दिली गेली तर आरोपींना चक्क फाईव्ह-स्टार हॉटेल सुविधेचा लाभ घेत आहेत", असं तिरुमूर्ती म्हणाले. यात त्यांचा रोख प्रामुख्यानं डी-कंपनी आणि म्होरक्या दाऊद इब्राहिम याच्याकडे होता. दाऊद सध्या पाकिस्तानातच लपून बसल्याचा दावा केला जात आहे.
दाऊद पाकिस्तानातच
पाकिस्ताननं ऑगस्ट २०२० रोजी पहिल्यांदाच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं मान्य केलं होतं. याआधी सरकरानं ८८ दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांवर बंदी घातल्याची माहिती दिली होती. यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचाही समावेश होता.