खालिदा झियांचे वकील आणि ब्रिटिश खासदार कॅरलिल यांना भारताने पाठवले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 03:53 PM2018-07-12T15:53:37+5:302018-07-12T15:54:18+5:30
कॅरलिल सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा खटला चालवत आहेत.
नवी दिल्ली- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि ब्रिटीश खासदार लॉर्ड अलेक्झांडर कॅरलिल यांना दिल्ली विमानतळावरून परत पाठविण्यात आले आहे. योग्य व्हीसा नसल्याचे कारण देत भारताने त्यांना प्रवेश नाकारला आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपी पक्षाच्या अध्यक्षा खालिदा झिया सध्या तुरुंगात आहेत. लॉर्ड कॅरलिल त्यांचा खटला चालवत असून त्या खटल्याबाबत पत्रकार परिषद घेण्यासाठी ते भारतात आले होते. मात्र त्यांच्याकडे योग्य व्हीसा नसल्याचे सांगत विमानतळावरूनच माघारी जाण्यास सांगण्यात आले.
British parliamentarian Lord Alexander Carlile denied entry into India on his arrival in #NewDelhi for not having appropriate Indian visa.
— All India Radio News (@airnewsalerts) July 12, 2018
लॉर्ड कॅरलिल यांनी ज्या कामासाठी भारतात येण्याचे ठरवले होते त्यासाठी लागणारा व्हीसा त्यांच्याकडे नव्हता. व्हीसाच्या अर्जावर त्यांनी या कामाची नोंद केली नव्हती. म्हणून त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी लॉर्ड कॅरलिल यांना बांगलादेशात येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे कॅरलिल यांनी खालिदा झिया यांच्या खटल्यातील गुंतागुंतीबाबत भारतात पत्रकाराशी बोलू असा निर्णय घेतला होता. पत्रकारांना भेटण्याच्या उद्देशाने ते भारतात येतच असले तरी व्हीसाची मागणी करताना हा उद्देश त्यांनी स्पष्ट केला नव्हता.
लॉर्ड कॅरलिल यांनी आजवर अनेक मोठ्या खटल्यांचे कामकाज पाहिले होते. खालिदा झिया यांच्यावर डझनभर आरोप असून त्यांना राजकारणाबाहेर ठेवण्यासाठी हे केलं जात असल्याचा आरोप त्यांच्या पक्षाने केला आहे.