तणावाची भारताने चिंता करू नये- चीन
By admin | Published: May 13, 2014 04:43 AM2014-05-13T04:43:05+5:302014-05-13T04:43:05+5:30
दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे.चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे.
बीजिंग : दक्षिण चीन समुद्रातील तणावाबाबत भारताने अधिक चिंता करण्याचे काहीही कारण नसल्याचे चीनने म्हटले आहे. चीनने भारताच्या चिंतेवर नाराजी व्यक्त केली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्टीकरण दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनिइंग म्हणाले, ‘दक्षिण चीन समुद्रातील परिस्थितीबाबत मी यापूर्वीच माहिती दिलेली आहे. भारतीय लोकांनाही मी सांगू इच्छितो की, दक्षिण चीन समुद्रातील सध्याच्या परिस्थितीबाबत अधिक चिंता करू नये.’ चीन आणि व्हिएतनामच्या नौका दक्षिण चीन समुद्रात फसल्या आहेत. यामुळे या भागात तणावाची स्थिती उद्भवली असून, यावर भारताने गेल्या आठवड्यात चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, चीनकडून वादग्रस्त बंदराच्या क्षेत्रात तेल उत्खननाचा प्रयत्न झाल्यामुळे तणावात वाढ झाली आहे. व्हिएतनाम आणि चीन यांच्याकडून या भागावर मालकी सांगितली जाते. भारताने या संपूर्ण घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली होती. प्रादेशिक शांतता, स्थिरता, विकास आणि समृद्धी जगाच्या हिताचे आहे, असे नवी दिल्ली येथून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. चीन आणि सार्क देशांनी दक्षिण चीन समुद्रात शांतता आणि स्थिरता यासाठी एक आदर्श आचारसंहितेची घोषणा केली आहे. संबंधित देश चीनबाबत त्याच दिशानिर्देशांचे पालन करतील, अशी अपेक्षा हुआ यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था) गेल्या आठवड्यात दक्षिण चीन समुद्राच्या मुद्यावरून अमेरिका आणि जपानच्या प्रतिकियांवर चीन नाराज आहे. चीनने व्हिएतनामद्वारे चिन्हित आणि चीनद्वारा वादग्रस्त घोषित क्षेत्रात भारताच्या ओएनजीसी कंपनीकडून तेल उत्खनन प्रक्रियेत सहभागी होण्यावर आक्षेप घेतला होता. (वृत्तसंस्था)