युनोमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले; काश्मीर प्रश्न पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 02:32 AM2020-01-17T02:32:40+5:302020-01-17T02:33:00+5:30
द्विपक्षीय संबंध सुधारण्यास कठोर परिश्रम घेण्याचा सल्ला
संयुक्त राष्ट्रे/इस्लामाबाद : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत चीनच्या मदतीने काश्मीरचा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानलाभारताने फटकारले असून, ताज्या प्रयत्नांतही पाकिस्तानला कोणत्याही देशाकडून पाठिंबा मिळाला नाही.
पाकिस्तानने भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध सर्वसामान्य कसे होतील यावर ‘कठोर परिश्रम’ घेण्याची गरज आहे, असेही भारताने त्याला ठणकावून सांगितले. सुरक्षा परिषदेचे लक्ष बुधवारी काश्मीर प्रश्नावर वेधण्यासाठी पाकिस्तानचा नेहमीचा मित्र चीन पाकिस्तानच्या बाजूने एकटाच उभा होता. १५ देश सदस्य असलेल्या सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्य देशांनी काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय असल्याचे म्हटल्यामुळे त्याचा ताजा प्रयत्न वाया गेला.
तत्पूर्वी, चीनने सुरक्षा परिषदेच्या बंद दाराआड झालेल्या विचारविनिमय बैठकीत ‘इतर विषय’ नावाखाली काश्मीरचा विषय नव्याने उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. ‘संयुक्त राष्ट्रांच्या एका सदस्य देशाने पुन्हा केलेला प्रयत्न आम्ही बघितला. तो इतर सर्व देशांच्या स्पष्ट भूमिकेमुळे अपयशी ठरला,’ असे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन म्हणाले. ‘आम्हाला समाधान आहे की, संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी रंगवलेली धोक्याची परिस्थिती विश्वासार्ह वाटली ना पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी पुन्हा पुन्हा केलेले आरोप’, असे अकबरुद्दीन यांनी सांगितले.
‘झालेले प्रयत्न हे लक्ष दुसरीकडे नेण्याचे प्रयत्न समजले गेले याचा आम्हाला आनंद आहे आणि अनेक मित्रांनी याकडे लक्ष वेधले आहे की, पाकिस्तान भारतासोबतच्या त्याच्या संबंधांत प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी द्विपक्षीय व्यवस्थेचा वापर करू शकतो, असे अकबरुद्दीन म्हणाले.
अटकेतील डीएसपींचे पोलीस पदक घेतले परत
श्रीनगर : दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरच्या बाहेर जाण्यास मदत केल्याच्या आरोपात अटक असलेले पोलीस उप अधीक्षक देविंदर सिंग यांना देण्यात आलेले ‘शेर-ए-काश्मीर’पोलीस पदक परत घेण्यात आले आहे. सरकारी आदेशात म्हटले आहे की, निलंबित अधिकाºयाचे वर्तन विश्वासघातासारखे असून, यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली आहे.
देविंदर सिंग यांना २०१८ मध्ये पोलीस पदक मिळाले होते. पोलिसांनी शनिवारी दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात मीर बाजारामध्ये हिज्बुल- मुजाहिद्दीनचे दोन अतिरेकी नवीद बाबा आणि अल्ताफसोबत देविंदर सिंग याला अटक केली होती. याशिवाय एक अज्ञात वकीलही त्यांच्यासोबत होता जो अतिरेकी संघटनेसाठी काम करीत होता.
सरकारी आदेशात म्हटले आहे की, दोन अतिरेक्यांना काश्मीरच्या बाहेर जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न विश्वासघातासारखाच आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली आहे. ११ जानेवारी रोजी देविंदर सिंगला अटक करण्यात आली होती. या घटनाक्रमामुळे त्यांचे पदक परत घेतले जात असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. अटकेनंतर तात्काळ सिंग यांच्या निवासस्थानासह विविध भागात पोलिसांची टीम पाठविण्यात आली होती. सिंग यांच्या घरातून दोन पिस्तूल, एक एके रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.