पाकिस्तान उच्चायुक्तांना भारताने बजावला समन्स
By admin | Published: May 3, 2017 06:29 PM2017-05-03T18:29:16+5:302017-05-03T18:29:16+5:30
दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना केल्याप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना समन्स बजावला
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना केल्याप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. बुधवारी भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावलं तसेच या प्रकरणी पाकिस्तानने कारवाई करण्याची मागणी भारताने केली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव गोपाळ बागले यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. यावेळी अब्दुल बासित यांच्यासमोर शहीद जवानांचा मुद्दा तसेच त्यांच्या मृतदेहासोबत केलेल्या विटंबनेचा मुद्दाही उपस्थित केला अशी माहिती त्यांनी दिली.
पाकिस्तानी सैनिकांनी कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय हद्दीत प्रवेश केला होता, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे आमच्याकडे असल्याचे भारताने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांवर आणि घटनास्थळी सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांवरून हल्लेखोर पुन्हा सीमारेषेपलीकडे पळून गेल्याचे सिद्ध होते असं ते म्हणाले.
यापुर्वी काल (दि.3) भारताच्या डीजीएमओंनी (लष्करी कारवाईचे प्रमुख) पाकिस्तानच्या या कृत्याला सडतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून भारताने पाकला समन्स बजावले.