"वाईट काळातच होते खऱ्या मित्राची ओळख"; मदतीसाठी तुर्कीने मानले भारताचे मनापासून आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 10:48 AM2023-02-07T10:48:05+5:302023-02-07T10:55:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भारत तुर्कीला तातडीने मदत पाठवत आहे. भारताने NDRF बचाव पथक, औषधे आणि वैद्यकीय पथक तातडीने तुर्कीला पाठवण्याची घोषणा केली.
भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये प्रचंड हाहाकार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. 5.6 हजार घरे आणि इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या कठीण काळात भारताने तुर्कीला मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार भारत तुर्कीला तातडीने मदत पाठवत आहे. भारताने NDRF बचाव पथक, औषधे आणि वैद्यकीय पथक तातडीने तुर्कीला पाठवण्याची घोषणा केली. वाईट काळात भारताच्या या मदतीबद्दल तुर्कीने मनापासून भारताचे आभार मानले आहेत.
भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी भारतातील तुर्की दूतावास गाठले आणि या संकटाच्या वेळी सोबत उभे राहण्याचे आश्वासन दिले. तुर्कीचे राजदूत फिरात सुनेल यांची भेट घेऊन, मुरलीधरन यांनी भूकंपामुळे झालेल्या विनाशाबद्दल दु:ख व्यक्त केले आणि भारताकडून होणाऱ्या मदतीबद्दलही सांगितले. या भेटीनंतर फिरात सुनेल यांनी ट्विट करून भारताचे आभार मानले. ते म्हणाले, "मित्र हा हिंदी आणि तुर्की या दोन्ही भाषांमध्ये सामान्य बोलचालीतील शब्द आहे." ते पुढे म्हणाले की, "तुर्की भाषेत एक म्हण आहे. Dost kara günde belli olur म्हणजे जो कठीण प्रसंगी कामी येतो तोच खरा मित्र असतो. भारताचे मनापासून आभार."
पंतप्रधान मोदींनी तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तॅय्यप एर्दोगन यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, तुर्कीमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीमुळे मी दु:खी आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमींची प्रकृती लवकर सुधारेल अशी आशा आहे. भारत तुर्कीच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि याला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. पंतप्रधान मोदींसोबतच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही तुर्कीमधील विध्वंसाबद्दल शोक व्यक्त केला.
पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएम मोदींच्या सूचनेनुसार पंतप्रधानांचे मुख्य सचिव पीके मिश्रा यांनी तुर्कीला तत्काळ मदत पाठवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली. तुर्कीला लवकरात लवकर मदत साहित्य पाठवण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एनडीआरएफच्या दोन तुकड्या तुर्कीला रवाना झाल्या असून त्यात विशेष श्वान पथकासह 100 जवानांचा समावेश आहे. कुशल डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्सचे वैद्यकीय पथकही यात सामील आहे. भारताप्रमाणेच अमेरिका, रशिया, जर्मनीनेही तुर्कस्तानला मदत पाठविण्याची चर्चा केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"