दहशतवादाविरुद्ध भारत-ट्युनिशिया एकत्र लढणार
By Admin | Published: June 4, 2016 02:38 AM2016-06-04T02:38:03+5:302016-06-04T02:38:03+5:30
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत आणि ट्यूनिशिया यांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे ट्युनिशियाच्या दौऱ्यावर आहेत.
ट्युनिस : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत आणि ट्यूनिशिया यांनी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे ट्युनिशियाच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, दहशतवादाचे धोके दूर करण्यास समान विचारधारा असलेल्या सहकाऱ्यांनी सहकार्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ट्युनिशियाचे पंतप्रधान हबीब एस्सिदी यांच्यासोबत चर्चा केली. हस्तशिल्प आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी एका करारावर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अन्सारी म्हणाले की, आम्ही प्रामुख्याने दहशतवादावर चर्चा केली. दोन्ही देश या संकटाचा सामना करीत आहेत. अन्सारी व एस्सिदी यांच्यात झालेल्या व्यक्तिगत स्तरावरील बैठकीनंतर दोन्ही देशांत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील बैठक झाली. तसेच डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित दोन करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या. अन्सारी म्हणाले की, आगामी पाच वर्षांत भारत ट्युनिशियातील ३५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देईल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थान प्राप्त करण्यास भारताच्या प्रयत्नांना ट्युनिशियाने जे समर्थन दिले आहे त्याबद्दल अन्सारी यांनी समाधान व्यक्त केले.