भारतातील आपल्या अधिकाऱ्यांना पाक माघारी बोलावणार
By Admin | Published: November 2, 2016 04:25 AM2016-11-02T04:25:51+5:302016-11-02T04:25:51+5:30
पाकिस्तान नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्त कार्यालयात नियुक्त असलेल्या चार अधिकाऱ्यांना परत बोलावण्याच्या विचारात आहे.
इस्लामाबाद : हेरगिरी करीत असल्याबद्दल पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला भारताने हाकलून दिल्यानंतर पाकिस्तान नवी दिल्लीतील आपल्या उच्चायुक्त कार्यालयात नियुक्त असलेल्या चार अधिकाऱ्यांना परत बोलावण्याच्या विचारात आहे.
मंगळवारी ‘डॉन’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार चार अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. या चार अधिकाऱ्यांची नावे अशी- सईद फारूख हबीब (व्यापार सल्लागार) आणि खदीम हुसेन, मुदस्सीर चीमा आणि शाहीद इक्बाल (सर्व प्रथम सचिव).
उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचारी महमूद अख्तर यांना भारताने देशाबाहेर घालवले. अख्तर यांचे रेकॉर्ड केलेले निवेदन भारताने प्रसार माध्यमांना उपलब्ध करून दिल्यानंतर पाकिस्तानने अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याचा विचार सुरू केला.
अख्तर यांनी ‘डॉन’ला सांगितले की, माझ्याकडून जबरदस्तीने निवेदन घेण्यात आले. राजनैतिक शिष्टाचाराचा हा गंभीर स्वरुपाचा भंग असल्याचे आम्ही मानतो, असे पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)