भारताला एकाचवेळी चीन-पाकिस्तानबरोबर युद्ध नाही झेपणार! ड्रॅगनचा फुत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 02:48 PM2017-09-08T14:48:35+5:302017-09-08T14:49:54+5:30
दोन दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे.
नवी दिल्ली, दि. 7 - दोन दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी भारताने एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे वक्तव्य केले होते. रावत यांचे हे विधान चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले असून, शुक्रवारच्या ग्लोबल टाइम्सच्या लेखातून जनरल बिपिन रावत यांच्यावर आगपाखड करण्यात आली आहे. ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारच्या मालकीचे वृत्तपत्र आहे.
रावत यांच्या उद्दामपणामुळे भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे लेखात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दिशेने पाऊले टाकली. आता डोकलामचा विषय मागे सोडून पुढे वाटचाल करावी असे अनेकांचे मत आहे. अशा परिस्थितीत बिपिन रावत यांनी पूर्णपणे विरुद्ध संदेश देणारे विधान केले आहे असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे.
भारताला एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध परवडणार नसल्याचे लेखात म्हटले आहे. जनरलनी नीट माहिती घेतली पाहिजे. एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानबरोबर युद्ध सुरु झाले तर, भारत परिणाम सहन करु शकेल का ? असे लेखात म्हटले आहे. डोकलामचा तिढा लवकर सुटेल असे चीनी लोकांना वाटत नव्हते पण आता हा वाद निकाली निघालेला असताना रावत चुकीचा संदेश जाईल अशी विधाने करत आहेत.
आम्ही पहिल्यांदा परिस्थिती चिघळेल अशी कृती करणार नाही आणि भारतालाही करु देणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. चीनबरोबर भविष्यात डोकलाम सारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते अशावेळी भारतीय लष्कर चीनविरुद्धच्या आघाडीवर सक्रीय असताना पाकिस्तान या परिस्थितीचा फायदा उचलू शकतो. त्यामुळे भारताला एकाचवेळी दोन्ही देशांना अंगावर घेण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे विधान बिपिन रावत यांनी केले होते.