इराणकडून नोव्हेंबरपासून तेलखरेदी बंद? कंपन्यांनी ऑर्डरच दिल्या नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 06:44 PM2018-09-26T18:44:00+5:302018-09-26T18:49:20+5:30
अमेरिकेने निर्बंध घातल्याने इराणकडून तेलखरेदी बंद करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असे झाले तर भारतातील इंधनाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता असून इराणलाही मोठा फटका बसणार आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेने निर्बंध घातल्याने इराणकडून तेलखरेदी बंद करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असे झाले तर भारतातील इंधनाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता असून इराणलाही मोठा फटका बसणार आहे. भारतीय तेल रिफायनरी कंपनी इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियमने नोव्हेंबरमध्ये तेल खरेदी करण्यासाठी नोंदणीच केली नसल्याने यावर शिक्कामोर्तब होत आहे.
तेल उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानुसार नायरा एनर्जीदेखील इराणकडून तेल न घेण्याचा विचार करत आहे. तर मंगळुरु रिफायनरीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीने इराणला नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणतीही ऑर्डर दिलेली नाही. परंतू नंतर देण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तेल पुरवठ्यासाठी ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत ऑर्डर दिली तरी चालते. यामुळे कंपन्यां इराणकडून तेल न घेण्याचा विचार बदलूही शकतात.
इराणवरील निर्बंधांमुळे त्या देशाकडून येणाऱ्या कच्च्या तेलामध्ये घट झाली आहे. यामुळे बॅरलचा दर चार वर्षातील सर्वोच्च पातळीवर आहे. उत्पादन कमी झाल्याने तेलाच्या किंमती वाढणार आहेत. यामुळे रिफायनरी दुसऱ्या देशांकडून तेल आयात करण्याचा विचार करत आहेत. जगातील सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि रशियाकडेच उत्पादन वाढविण्याची क्षमता आहे.
चीननंतर भारत हा इराणकडून तेल विकत घेणारा दुसरा मोठा देश आहे. भारताने यंदा प्रति दिन सरासरी 5 लाख 77 हजार बॅरल तेल मागविले आहे. हे तेल मध्य पूर्व देशांच्या तुलनेत 27 टक्के आहे.
दुसरीकडे दक्षिण कोरिया, जपान आणि युरोपिय देश इराणकडून तेल खरेदी बंद करणार आहेत. यामुळे भारतानेही तेल खरेदी बंद केल्यास तो इराणला मोठा फटका असेल. तर अमेरिकेने इराणकडून तेल खरेदीला 4 नोव्हेंबरची शेवटची मुदत देण्यात आली आहे. यामुळे 2014 नंतर प्रथमच तेलाची किंमत 100 डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे.